Saturday, 1 July 2017

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची आणि जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा -सहपालकमंत्री महादेव जानकर


                                                                  
उस्मानाबाद.दि.1:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामे शासनाने दिलेल्या विहीत मुदतीत गुणवत्तापूर्वक पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर  यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार अभियान कामाचा आढावा बैठक सहपालकमंत्री श्री.जानकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार,उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, वन विभागीय अधिकारी राजेश्वर सातेलीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार अभियान,जलसंधारण या कामा करिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही त्यामुळे हे कामे वेळेत पूर्ण करावेत. या कामात जे अधिकारी कुचराई करतील त्यांची गंभीर दखल घेवून निलंबनाची  कारवाई करण्यात येईल, असे ही श्री.जानकर यावेळी म्हणाले.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत जिल्हयात सन 2015-16 यावर्षी 69.90 किमी लांबीची 7 कामे मंजूर होते त्यामध्ये प्रगतीपथावर 6 कामे असून त्यांची लांबी 63.20 आहे तर  1 काम पूर्ण झाले असून त्यांची लांबी 6.70 किमी इतकी आहे.सन 2016-17 मध्ये बॅच 1 मध्ये 5 कामे मंजूर असून त्यांची लांबी  74.10 असून हे कामे प्रगतीपथावर आहेत.तर सन 2016-17 बॅच -2 मध्ये 6 कामे मंजूर असून त्यांची लांबी  67.30 आहे तर सन 2016-17 बॅच-3 मध्ये 4 कामे मंजूर असून त्यांची लांबी 42.31  अशी असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2017-18 मध्ये मागील वर्षाप्रमाणे 182 किमीचे उद्दिष्य्ट  जिल्हयासाठी देण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 मध्ये जिल्हयातील 217 गावामध्ये  एकूण मंजूर आराखडयानुसार कामे 21 हजार 25 इतकी होती त्यासाठी मंजूर आराखडयानुसार 144.85 रुपये कोटी रक्कम होती.यामध्ये पूर्ण कामांची संख्या 21 हजार 25 असून खर्च ही पूर्ण झाला आहे.सन 2016-17 मध्ये 191 गावाची निवड करण्यात आली  यामध्ये 16 हजार 795 कामांचा आराखडा तयार करण्यात आला यासाठी 237.89 कोटी रुपये रक्कम आराखडा मंजूर करण्यात आला, यामध्ये 9 हजार 49 कामे पूर्ण झाले असून 4 हजार 643 कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण कामावर 43.41 कोटी रुपये रक्कम खर्च झाले आहेत. सन 2017-18 मध्ये 178 गावांची निवड  करण्यात आली असून यामध्ये 7 हजार 570 कामे असून यासाठी 25610.29 लक्ष रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे तर मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 3 हजार 700 शेततळयाचे उददीष्टये असून 2 हजार 207 कामे पूर्ण झाले असून 480 कामे  चालू असलेल्या शेततळयाची संख्या आहे.अनुदान अदायगी केलेल्या शेततळयाची संख्या 863 असून वितरित निधी 369.01 रुपये लक्ष असल्याचे यावेळी सांगितले.
            यावेळी तालुकानिहाय कामांच्या गतीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माहितीचे सादरीकरण श्री. कुलकर्णी यांनी केले तर जलयुक्त शिवार अभियानाच्या योजनेच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  जमदाडे यांनी केले.
            तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील महादेव सुतार यांनी प्रशासन आणि जनता यांनी एकत्रीतपणे काम करुन वृक्षसंगोपण व संवर्धन कशा प्रकारे केले जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती यावेळी दिली.