Wednesday, 28 June 2017

वीज ग्राहक तक्रार निवारण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या सूचना



उस्मानाबाद.दि.28:- महावितरणतर्फे वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित तक्रार निवारण उपक्रमास वीज ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दाखल झालेल्या वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावरील तक्रारींची दखल घेत महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री.ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से) यांनी ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्याच्या सूचना महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
          उस्मानाबाद जिल्हयातील वीज ग्राहकांची गाऱ्हाणी ऐकून प्राप्त तक्रारी सोडविण्याचा दिलासादायक कार्यक्रम महावितरणतर्फे दि.28 जून 2017 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.या कार्यक्रमास सह व्यवस्थापकीय संचालक श्री.बकोरिया यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,दत्ता कुलकर्णी, यांच्यासह लातूर  परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड,पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.डी.डी. हांमद, बीडचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे,  अधीक्षक अभियंता प्रकाश पौनीकर,कार्यकारी अभियंता श्री. गुप्ता यांच्यासह पंचायत समिती, नगर परिषदेच्या सदस्यांसह अनेक सरपंच, कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले.
          यावेळी अनेक तक्रारदारांनी महावितरणकडून होत असलेल्या अनियमित कामासह, रोहित्रे, त्यांची मंजूरी, उपलब्धता, त्याची वाहतूक, गुणवत्ता यासह नवीन उपकेंद्र उभारणीबाबत सूचना केल्या. अनेक ठिकाणी नियमित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सांगण्यात आल्या.कृषीसह रहिवाशी, व्यावसायिक वीज जोडण्यासंदर्भात विलंब होत असल्याचेही ग्राहकांकडून सांगण्यात आले. काही वीज ग्राहकांनी अधीक्षक अभियंता उस्मानाबाद यांच्याबाबतही तक्रारी केल्या.
          या सर्व तक्रारींची दखल सह व्यवस्थापकीय संचालकांनी घेवून त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी आणि महावितरण प्रशासन यांच्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे यांनी समन्वयवादी भूमिका घेत जिल्हयात सुरळीत आणि सुरक्षित वीजसेवा देण्याची महावितरणकडे अपेक्षा व्यक्त केली.