Tuesday, 21 July 2026

मिशन लक्ष्यवेधअंतर्गत रोईंग व कुस्तीसाठी फेरनिवड चाचणी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेधअंतर्गत रोईंग व कुस्तीसाठी फेरनिवड चाचणी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव दि.२१ जुलै (जिमाका) क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत पुणे विभागासाठी अॅथलेटिक्स,शूटिंग,रोईंग,कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकी या सहा क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंची निवड चाचणी दि.२३ व २४ मार्च २०२६ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे आयोजित करण्यात आली होती.मात्र,रोईंग आणि कुस्ती या खेळांसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या दोन क्रीडा प्रकारांसाठी फेरनिवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. रोईंग या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी दि.२२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता क्रीडा संकुल, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर,पुणे येथे होणार आहे.या निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री.संदीप भापकर (रोईंग प्रशिक्षक) – ९८२२२३५५७७ यांच्याशी संपर्क साधता येईल. कुस्ती या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी दि.२४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,शारदानगर, माळेगाव-नीरा बारामती रोड येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी श्री.शेलार (क्रीडा शिक्षक) – ९०७५१०७१२१ तसेच श्री.रणवरे (क्रीडा शिक्षक) – ९४२३२४०२८० यांच्याशी संपर्क साधता येईल. निवड चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,आधार कार्ड, गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे तसेच शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ही सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्राच्या प्रवेशासाठी ही निवड चाचणी आयोजित करण्यात आली असून,अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेले अथवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेले,३१ डिसेंबरपर्यंत वय २५ वर्षांपर्यंत असलेले इच्छुक मुले व मुली यांनी आवश्यक कागदपत्रे व साहित्यांसह संबंधित निवड चाचणी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निवड प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन,पूरक आहार,क्रीडा व प्रशिक्षण साहित्य,देशांतर्गत व परदेशातील प्रशिक्षण,देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागाचा खर्च,वैद्यकीय तपासण्या तसेच किरकोळ वैद्यकीय खर्च यांचा लाभ विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा,पुणे विभाग,पुणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड चाचण्यांमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे. *****