Thursday, 23 July 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला उमरगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद १५ हजार नागरिकांची उपस्थिती ; विविध शासकीय योजनांचा १८ हजार १९ लाभ, ३३० अर्जांचा स्वीकार

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला उमरगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद १५ हजार नागरिकांची उपस्थिती ; विविध शासकीय योजनांचा १८ हजार १९ लाभ, ३३० अर्जांचा स्वीकार धाराशिव,ता.२३ जुलै (जिमाका) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील पहिले शिबिर बुधवारी २२ जुलै रोजी आदर्श महाविद्यालय,उमरगा येथे उत्साहात पार पडले.शिबिराला सुमारे १५ हजार नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनाची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेतला. महसूल,आरोग्य,नगर परिषद, पंचायत समिती,महिला व बाल विकास,सामाजिक न्याय,कृषी, वन,पोलीस,परिवहन,टपाल, भूमिअभिलेख,निबंधक,रोजगार, तहसील आदी विभागांनी संयुक्तपणे नागरिकांना माहिती देऊन सेवा उपलब्ध करून दिल्या. महसूल विभागामार्फत राज्यातील महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र,गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना,शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे,तुकडेबंदी कायद्यांतर्गत स्थानिक क्षेत्र घोषणा,"जिवंत सातबारा" मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना,घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, कुंभार समाजासाठी सवलती, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी आदी योजनांची माहिती स्टॉलला भेट देणाऱ्यांना देण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत १२,'जिवंत सातबारा' मोहिमेत १,३२४, घरकुल योजनेअंतर्गत १०,शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफीचे १४ लाभ देण्यात आले. शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ४८५ अर्ज प्राप्त झाले असून त्यावर नियमानुसार कार्यवाही सुरू आहे. याशिवाय अ.क्र.१ ते ११ व्यतिरिक्त राज्य शासनाच्या विविध योजनांचा १७,५७७, केंद्र शासनाच्या योजनांचा २३०,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा २१२ लाभ देण्यात आला.या विभागातून एकूण १९ हजार ३७९ लाभार्थ्यांना लाभ मिळाला. नगर परिषद उमरगा,मुरूम व लोहारा यांच्या माध्यमातून रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजना,डीआरडी प्रमाणपत्र, बांधकाम परवाने, झोन दाखले, नामांतर नोंदी आदी सेवांचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागाने ८ हजार ८७१ सामान्य आरोग्य तपासण्या,३४७ बीपी व शुगर तपासण्या,१७३ महिला सामान्य तपासण्या,११० कुष्ठरोग तपासण्या,११० आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजना लाभ,५६ नवजात बालकांच्या हिप जॉइंट तपासण्या, ५४ शस्त्रक्रिया तपासण्या,३५ हृदयरोग,८५ अस्थिरोग आणि २१० कान-नाक-घसा तपासण्या केल्या. सामाजिक न्याय विभागाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पूरस्काराचे ७ लाभ,तर वन विभागाने वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत मार्गदर्शन केले.२२ लाभार्थ्यांना वनमहोत्सवांतर्गत रोपे दिली तसेच विविध योजनांची माहिती दिली. महिला व बाल विकास विभागाने लेक लाडकी योजनेसाठी १२ अर्ज, बालसंगोपन योजनेसाठी ९, प्रधानमंत्री मानवंदना योजनेसाठी ७ अर्ज भरले.तर सखी वन स्टॉप सेंटरसह विविध योजनांचे मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचे ११,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे ५,कृषी यंत्रीकरण योजनेचे १२,श्री. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे ७ प्रत्यक्ष लाभ देण्यात आले.तसेच पीककर्ज,सलोखा योजना, वाटणीपत्र,मुद्रांक शुल्क माफी आदी योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. परिवहन विभागाने वाहतूक नियम, ड्रंक अँड ड्राइव्ह,वाहन परवाना, एनसीसीआर पोर्टल व ऑनलाइन सुविधांबाबत जनजागृती केली. पोलीस विभागाने सायबर गुन्हे, व्हॉट्सॲप-इन्स्टाग्राम हॅकिंग, ओटीपी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समितीमार्फत संगांयो योजनेचे ४२९ मंजुरी आदेश,१२६ शिधापत्रिका, ४८२ डिजिटल ७/१२,९३ अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत,फेरफार निकाली काढणे आदी सेवा देण्यात आल्या. तहसील कार्यालय, उमरगा यांनी ४,७२४ विविध दाखले,१३५ संगांयो योजना मंजुरी आदेश,२५ शिधापत्रिका,४९ डिजिटल ७/१२, १९ अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी,तर तहसील कार्यालय,लोहारा यांनी १,३५० विविध प्रमाणपत्रे व दाखले वितरित केले. शिबिरामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देतानाच नव्या योजनांची माहिती,अर्ज स्वीकारणे,मार्गदर्शन आणि तातडीच्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या.एकूण १८ हजार १९ नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला,तर ३३० नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. ******