Thursday, 23 July 2026

शेतातून उद्योगाकडे… भूमच्या महिलांच्या नव्या प्रवासाची नांदी !

विशेष वृत्त शेतातून उद्योगाकडे… भूमच्या महिलांच्या नव्या प्रवासाची नांदी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महिला सक्षमीकरण,शाश्वत ग्रामीण विकास आणि कृषीपूरक उद्योजकतेला मिळालेल्या प्रोत्साहनाच्या पार्श्वभूमीवर AFCONS Infrastructure Ltd.आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या '१००० महिला उद्योजिका मिशन'मुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत आहे. ग्रामीण महिलांच्या हातात शेती आहे,कष्ट आहेत,जिद्द आहे; मात्र संधी,प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा अभाव असल्याने त्यांच्या कष्टांचे आर्थिक मूल्य अपेक्षित प्रमाणात वाढत नाही.या वास्तवाला बदलण्याचा प्रयत्न AFCONS Infrastructure Ltd. आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'शाश्वत कृषीआधारित उद्योजकतेद्वारे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण – १००० महिला उद्योजिका मिशन' या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना या प्रकल्पामुळे पूरक बळ मिळत आहे. या प्रकल्पासाठी भूम तालुक्यातील निवडक ४० गावांतील १,२०९ महिला शेतकऱ्यांचे सखोल आधारभूत (Baseline) सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणातून ग्रामीण महिलांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,कृषी आणि उद्योजकीय स्थितीचे वास्तव समोर आले. त्याचबरोबर महिलांमधील प्रचंड क्षमता आणि त्या क्षमतेला योग्य दिशा देण्याची गरजही अधोरेखित झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे राज्यात कौशल्याधारित महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात असून,अशा उपक्रमांना अधिक गती मिळत आहे. का निवडला भूम तालुका २०२५ मध्ये अतिवृष्टी,पूर आणि हवामान बदलाच्या परिणामामुळे भूम तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला.पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतीवरच अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे शेतीपूरक उद्योग,महिला उद्योजकता आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी या भागाची निवड करण्यात आली.या प्रकल्पाचा उद्देश केवळ महिलांना प्रशिक्षण देणे नाही,तर त्यांना कृषी उद्योजिका म्हणून घडविणे,त्यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करणे, हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता वाढविणे आणि शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था उभारणे हा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती आणि पूरक उद्योगांवर भर देण्याच्या धोरणाला अशा उपक्रमांमुळे अधिक बळ मिळत आहे. उद्योजकतेसाठी सक्षम वयोगट सर्वेक्षणातील १,२०९ महिलांपैकी तब्बल १,०१४ महिला (सुमारे ८४ टक्के) या २६ ते ४५ वर्षे या कार्यक्षम वयोगटातील आहेत.म्हणजेच उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि काम करण्याची क्षमता या महिलांकडे आहे. सर्वेक्षणात ९५.९ टक्के महिला विवाहित असल्याचे दिसून आले.म्हणजेच त्या शेती,कुटुंब आणि आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळत उद्योगक्षेत्रात उतरू इच्छित आहेत.महिलांपैकी ३८.७ टक्के महिला दहावीपर्यंत,तर २४.३ टक्के महिला आठवीपर्यंत शिक्षित आहेत.निरक्षरांचे प्रमाण अवघे ४.७ टक्के आहे.म्हणजेच मूलभूत शिक्षणाचा पाया मजबूत असून आता त्यांना उद्योग,विपणन आणि डिजिटल व्यवहाराचे कौशल्य देण्याची आवश्यकता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकासावर दिल्या जाणाऱ्या भरामुळे ग्रामीण महिलांना नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. उत्पन्न कमी; शेतीवर मोठे अवलंबित्व सर्वेक्षणातील ७५ टक्क्यांहून अधिक कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे.यातील ४५.८ टक्के कुटुंबांचे उत्पन्न एक ते दोन लाख रुपयांदरम्यान आहे.याचबरोबर ७०.२ टक्के महिलांचा मुख्य व्यवसाय शेती,तर २२.३ टक्के महिला मजुरीवर अवलंबून आहेत.म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक महिला शेती आणि मजुरीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले. उद्योजकता अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे.एकूण १,२०९ महिलांपैकी केवळ १५६ महिला (१३ टक्के) व्यवसाय करतात.त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे ९१ टक्के महिलांना उद्योजकतेचे कोणतेही प्रशिक्षण मिळालेले नाही.व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये दुग्धव्यवसाय (४५ टक्के) सर्वाधिक असून त्यानंतर शेळीपालन (१९ टक्के) आहे.किराणा, शिलाई,पीठ गिरणी,भाजीपाला उत्पादन, ब्युटी पार्लर,कुक्कुटपालन,चटई निर्मिती अशा लघुउद्योगांमध्येही काही महिलांनी पुढाकार घेतला आहे. डिजिटल जग अजून दूर आहे. व्यवसाय करणाऱ्या महिलांपैकी ७३ टक्क्यांकडे स्मार्टफोन असला तरी ६५ टक्के महिला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत.६० टक्के व्यवहार अजूनही रोख स्वरूपात होतात,तर ऑनलाईन विक्री करणाऱ्या महिला केवळ २ टक्के आहेत.उत्पादनाचे ब्रँडिंग,जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंगबाबतही मोठी दरी असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे डिजिटल सक्षमीकरणाला मिळालेल्या चालनेमुळे ही दरी कमी करण्यासाठी अशा प्रकल्पांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.बचतगट बनले महिलांचे खरे बळ या अभ्यासातील सर्वात आशादायी बाब म्हणजे ९७१ महिला (८० टक्के) स्वयं-सहाय्यता बचतगटांशी जोडलेल्या आहेत.बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या महिलांमध्ये ४५.३ टक्के महिलांनी बचतगटातून कर्ज घेतले,तर ३०.५ टक्के महिलांनी बँक आणि बचतगट या दोन्ही माध्यमांचा वापर केला.यावरून ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या उपक्रमाची जोड मिळत आहे. आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढतोय नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या निर्णयात ५९.६ टक्के महिला कुटुंबाशी चर्चा करून अंतिम निर्णय स्वतः घेतात,तर २५.६ टक्के महिला पूर्णपणे स्वतंत्र निर्णय घेतात. दैनंदिन व्यवसाय व्यवस्थापनात ५५.८ टक्के महिला स्वतः निर्णय घेतात.हा बदल ग्रामीण महिलांच्या वाढत्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महिलांच्या नेतृत्व विकासाला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळत असल्याचे या बदलातूनही दिसून येते.ग्रामसभेत सहभाग कमी; योजनांपासूनही वंचित सर्वेक्षणात ७५.४ टक्के महिला ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत,तर ७९ टक्के महिलांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही.ही आकडेवारी शासनाच्या विविध योजनांपर्यंत माहिती आणि पोहोच वाढविण्याची गरज अधोरेखित करते. हवामान बदलाचे मोठे आव्हान म्हणून ५८ टक्के कुटुंबांनी गेल्या वर्षभरात हवामान बदलामुळे आर्थिक संकटाचा सामना केला.अतिवृष्टी,पिकांचे नुकसान आणि उत्पन्नातील घट यामुळे महिलांनी शेतीपूरक उद्योगांकडे वळण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोच वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रकल्पाचे यश म्हणजे बदलाची सुरुवात हे सर्वेक्षण केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरते मर्यादित नाही.या माहितीच्या आधारे प्रत्येक गावातील महिलांच्या गरजेनुसार प्रशिक्षण,उद्योग निवड,वित्तीय साक्षरता,डिजिटल व्यवहार,बाजारपेठ उपलब्ध करून देणे,हवामान अनुकूल शेती आणि कृषीपूरक उद्योगांची उभारणी यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.महिलांच्या विद्यमान क्षमतेची ओळख करून त्यांना उद्योजिका म्हणून घडविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम,स्वावलंबी आणि उद्योजक बनविण्याच्या व्यापक उद्दिष्टांना अशा उपक्रमांमुळे प्रत्यक्ष बळ मिळत आहे. बदलाची बीजे पेरली आहेत… भूम तालुक्यातील महिलांकडे जिद्द आहे, श्रम आहे आणि शिकण्याची तयारी आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण,तंत्रज्ञान,वित्तीय सहाय्य आणि बाजारपेठ मिळाल्यास त्या केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे,तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महिला सक्षमीकरण,कृषी मूल्यवर्धन आणि ग्रामीण उद्योजकता यांना मिळणारे प्रोत्साहन अशा प्रकल्पांद्वारे अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरू शकते. AFCONS–स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या १००० महिला उद्योजिका मिशन'ने भूम तालुक्यात बदलाची बीजे पेरली आहेत.या बीजांचे सक्षम उद्योजकतेच्या वटवृक्षात रूपांतर झाले,तर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा हा प्रयोग महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो. संकलन जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव ******