Wednesday, 6 May 2026
जागतिक पुस्तक दिनानिमित्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञानभेट ; बालरोग परिषदेकडून २५० हून अधिक पुस्तके प्रदान
जागतिक पुस्तक दिनानिमित्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञानभेट ; बालरोग परिषदेकडून २५० हून अधिक पुस्तके प्रदान
धाराशिव दि.६ मे (जिमाका) वाचन संस्कृतीला चालना देत वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त बालरोग परिषद, धाराशिव शाखेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
दि.२३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी बालरोग विषयक महत्वाची व उपयुक्त अशी एकूण २५० हून अधिक पुस्तके प्रदान करण्यात आली.या पुस्तकांमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना तसेच निवासी डॉक्टरांना अभ्यासासाठी मोलाची सहाय्यता होणार असल्याचे सांगण्यात आले.
जागतिक पुस्तक दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो.या दिवशी वाचनाची संस्कृती वाढावी, ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि समाजात पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित व्हावे हा मुख्य उद्देश असतो.या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान,वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रवीण डुमणे,बालरोग विभागप्रमुख डॉ.शाम चौधरी,डॉ.घोगरे,डॉ. निलोफर भोरी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनटक्के,डॉ. बागल,डॉ.देशमुख आणि ग्रंथपाल श्री. निलेश खोलासे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी बालरोग परिषद, धाराशिव शाखेचे आभार मानत सांगितले की,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते आणि त्यांच्या सर्वांगीण ज्ञानविकासास मदत होते.यावेळी बालरोग परिषद,धाराशिव शाखा अध्यक्ष डॉ.दत्तात्रय खुणे,सचिव डॉ.नितीन भोसले,ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर तसेच डॉ.हंबीरे यांचीही उपस्थिती होती.
*****