Wednesday, 6 May 2026
इस्त्राईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; धाराशिवच्या युवकांसाठी ३५०० पदांची मागणी
इस्त्राईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; धाराशिवच्या युवकांसाठी ३५०० पदांची मागणी
धाराशिव,दि.६ मे (जिमाका) जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी परदेशात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून इस्त्राईलमध्ये नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (काळजीवाहू) क्षेत्रात तब्बल ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.या माध्यमातून इच्छुकांना परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून बांधकाम,आरोग्य तसेच इतर क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीवर भर दिला जात आहे.इस्त्राईलमध्ये नॉन वॉर झोनमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विविध विभागांशी समन्वय साधत हा उपक्रम संयुक्तरित्या राबविण्यासाठी संवाद सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी आवश्यक कौशल्य असणे गरजेचे आहे.भारतीय नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त किमान ९९० तासांचा कोर्स (OJT सहित) पूर्ण केलेला असावा.तसेच मिडवाइफरी,नर्सिंग,फिजिओथेरपी किंवा नर्सिंग असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय GDA/ANM/GNM/BSc Nursing/Post BSc Nursing ही शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे.
उमेदवारांना इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे अपेक्षित असून वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.
इस्त्राईलमध्ये नोकरीसाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडणार असून नियुक्ती वाटप,आरोग्य तपासणी,व्हिजा व पासपोर्ट प्रक्रियेसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत NSDC कडून केली जाणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा, राहण्याची तसेच जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच उमेदवारांना दरमहा कमाल १ लाख ९९ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.
इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (०२४७२-२९९४३४) वर संपर्क साधावा,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
******