Friday, 8 May 2026
जागतिक बँक तज्ज्ञांकडून स्मार्ट प्रकल्पाची पाहणी ; शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याचे कौतुक
जागतिक बँक तज्ज्ञांकडून स्मार्ट प्रकल्पाची पाहणी ; शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याचे कौतुक
धाराशिव,दि.८ मे (जिमाका) माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याची जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होत असल्याचे नमूद करत तज्ज्ञांनी कंपन्यांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील पिकलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच किणी येथील वरदविनायक फार्मर प्रोड्यूसर कंपनी येथे ५ मे रोजी जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी भेट दिली.या भेटीदरम्यान कंपनीने आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला.
जागतिक बँकेचे तज्ज्ञ श्री. आदर्शकुमार यांनी पिकलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या बियाणे प्रक्रिया युनिट व गोदाम बांधकामाची पाहणी केली.तसेच वरदविनायक फार्मर प्रोड्यूसर कंपनी,किणी येथील २० टीपीडी क्षमतेच्या अत्याधुनिक ‘फुली ऑटोमॅटिक’ दाळ मिल प्रकल्पाची माहिती घेतली.हे दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास जाऊन कार्यान्वित झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मार्केट लिंकेज,शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा,व्यवसाय आराखडा (बिझनेस प्लॅन) आदी विषयांवर संचालक व सभासदांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी सभासदांचे हित जपले जावे,अधिकाधिक शेतकऱ्यांना या कंपन्यांशी जोडून त्यांच्यापर्यंत योजनांचा फायदा पोहोचवावा,अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.ग्रामीण भागात कार्यान्वित झालेल्या स्मार्ट प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळत असून कृषी व्यवसायाला चालना मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान विभागीय नोडल अधिकारी लातूर श्री.भास्कर कोळेकर,जिल्हा प्रकल्प अमलबजावणी प्रमुख तथा प्रकल्प संचालक आत्मा श्री.विष्णू मिसाळ, नोडल अधिकारी VSTF श्री. चंद्रकांत माळी,नोडल अधिकारी PIU पुणे श्री.राजेंद्र साळवे,जिल्हा नोडल अधिकारी श्री.चेतन जाधव, जिल्हा व विभागीय अमलबजावणी कक्षातील अधिकारी व कर्मचारी, Palladium टीम,तसेच संबंधित कंपनीचे संचालक व सभासद उपस्थित होते.
******