Friday, 8 May 2026
सीईटी परीक्षांसाठी प्रशासन सतर्क ; परीक्षा केंद्रांवर कडक निर्बंध
सीईटी परीक्षांसाठी प्रशासन सतर्क ; परीक्षा केंद्रांवर कडक निर्बंध
धाराशिव दि.८ मे (जिमाका) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र,व्ही प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MBA/MMS CET-२०२६ (Phase-2) तसेच MHT-CET २०२६ (PCM व PCB) (Phase-2) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार,परीक्षा काळात केंद्र परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
MBA/MMS CET-२०२६ (Phase-2) ही परीक्षा ९ मे रोजी धाराशिव शासकीय तंत्रनिकेतन येथे दोन सत्रांत होणार आहे. सकाळचे सत्र सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत,तर दुपारचे सत्र दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
MHT -CET-२०२६ (PCB) (Phase-2) परीक्षा १० व ११ मे रोजी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आली आहे.ही परीक्षा देखील दोन सत्रांत पार पडणार असून सकाळी ७.३० ते दुपारी १२ आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
MHT -CET-२०२६ (PCM) (Phase-2) परीक्षा १२ मे ते २० मे या कालावधीत (दि. १६,१७ व १८ मे वगळून) तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव येथे होणार आहे.प्रथम सत्रात सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजतापर्यंत आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत राहील.
प्रशासनाच्या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात घोषणाबाजी,गोंधळ किंवा शांततेस बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानटपऱ्या, टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,संगणक केंद्रे, इंटरनेट कॅफे आदी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच मोबाईल फोन,सेल्युलर फोन, फॅक्स,ई-मेल सुविधा,रेडिओ,इंटरनेट साधने,संगणक,कॅलक्युलेटर किंवा तत्सम उपकरणे परीक्षा केंद्र परिसरात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना केंद्रात प्रवेश बंदी करण्यात आली असून केवळ परीक्षा केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी, शासकीय कामावरील कर्मचारी,संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
परीक्षार्थींच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.हे आदेश ९ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून २० मे रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
*******