Wednesday, 6 May 2026
समाधान समारोह-२०२६ : सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार ; घराघरात न्याय मिळवण्याची सुवर्णसंधी
समाधान समारोह-२०२६ : सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार ; घराघरात न्याय मिळवण्याची सुवर्णसंधी
धाराशिव,दि.६ मे (जिमाका) वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारातून ‘समाधान समारोह-२०२६’ या विशेष मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत २१,२२ व २३ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील उच्च न्यायालयात विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘सहभागी न्याय’ आणि ‘घराघरात न्याय’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने आणि जलद गतीने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.त्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत,त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.आपसी तडजोडीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.अभिश्री देव व सचिव श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
या ‘समाधान समारोह-२०२६’ उपक्रमाचे अनेक फायदे आहेत. वर्षानुवर्षे चालणाऱ्या खटल्यांचा निकाल दोन्ही बाजूंच्या संमतीने काही तासांत लागू शकतो, त्यामुळे वेळेची मोठी बचत होते.तसेच लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यास कोर्ट फी परत मिळण्याची तरतूद असून वकिलांच्या दीर्घकालीन खर्चातूनही सुटका होते. या प्रक्रियेत हार-जीत यापेक्षा सामोपचाराने तोडगा काढण्यावर भर दिला जातो,ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्यास मदत होते.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना घरबसल्या सहभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.इच्छुकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यासाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता नसणार आहे.
न्याय आता केवळ न्यायालयाच्या इमारतीपुरता मर्यादित न राहता,तो नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन प्रकरणे निकाली काढत तणावमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष लोक अदालतीबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
*****