Tuesday, 26 May 2026

मदद माश जमिनी नियमितीकरणासाठी दर बुधवारी शिबीर ; भोगवटदारांना लाभ घ्यावा

मदद माश जमिनी नियमितीकरणासाठी दर बुधवारी शिबीर ; भोगवटदारांना लाभ घ्यावा धाराशिव,दि.२६ मे (जिमाका) हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम १९५४ मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग चार,दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अन्वये नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.त्यानुसार नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटदार वर्ग दोन) धारण केलेल्या मदद माश जमिनींचे निवासी प्रयोजनासाठी पूर्वीच हस्तांतरण करण्यात आले असल्यास,ते नियमित करण्यासाठी तहसील कार्यालय,धाराशिव येथे दर बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी किंवा इतर सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीशिवाय निवासी कारणासाठी हस्तांतरण करण्यात आलेल्या जमिनींसाठी विक्रीखत, बक्षीसपत्र,भाडेपट्टा करार यांसारखे नोंदणीकृत संलेख पुरावा म्हणून सादर करता येणार आहेत.तसेच असे नोंदणीकृत संलेख उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेकडील मालमत्ता कर आकारणी नोंदवहीची प्रमाणित प्रत हस्तांतरणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. विशेष म्हणजे, अशा हस्तांतरणाचे नियमितीकरण करताना नजराणा म्हणून कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही. संबंधित भोगवटदारांनी विक्रीखत, बक्षीसपत्र,भाडेपट्टा करार, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील मालमत्ता कर आकारणी नोंदवहीची प्रमाणित प्रत यापैकी उपलब्ध कागदपत्रे तसेच संबंधित क्षेत्राचा निवासी प्रयोजनासाठी वापर होत असल्याबाबतचे शपथपत्र शिबिरात सादर करावे,असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.तसेच नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा,असे कळविले आहे. *******