Tuesday, 26 May 2026
विमा अर्जातील त्रुटी तातडीने दूर करा ; ४१०२ अर्ज पुनर्पडताळणीसाठी परत
विमा अर्जातील त्रुटी तातडीने दूर करा ; ४१०२ अर्ज पुनर्पडताळणीसाठी परत
धाराशिव,दि. २६ मे (जिमाका) प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ अंतर्गत विमा भरलेल्या काही शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्रांतील किरकोळ त्रुटींमुळे विमा कंपनीमार्फत अपात्र ठरविण्यात आले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत संबंधित विमा कंपनीला अपात्र अर्जांची पुनश्च छाननी करून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने केंद्र शासनस्तरावरून एकूण ४१०२ अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी परत प्राप्त झाले आहेत. शेतकरीनिहाय अर्जांची यादी तालुकास्तरावर तसेच आपले सरकार सेवा केंद्र धारकांकडे उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अर्जांमध्ये प्रामुख्याने आधार क्रमांकातील तफावत,बँक खात्याची अपूर्ण माहिती,सातबारा उताऱ्यावरील तपशीलातील विसंगती,पीक पेरणी तपशीलातील त्रुटी तसेच आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता आढळून आली आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन अर्जातील त्रुटींची पूर्तता तात्काळ करून घ्यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.त्रुटी पूर्ततेवेळी आधारकार्ड, बँक पासबुक,सातबारा उतारा,पेरणी स्वयंघोषणापत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत,असेही सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यात विलंब केल्यास संबंधित अर्ज प्रलंबित राहण्याची अथवा विमा लाभ मंजुरीस उशीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी किंवा विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.
******