Monday, 15 June 2026
धाराशिवमध्ये बालकामगारविरोधी कारवाई; बेकरी गोडाऊनमधून दोन किशोरवयीन कामगारांची सुटका संयुक्त पथकाची धडक मोहीम ; संबंधित मालकाविरुद्ध कामगार कायद्यान्वये कारवाई
धाराशिवमध्ये बालकामगारविरोधी कारवाई; बेकरी गोडाऊनमधून दोन किशोरवयीन कामगारांची सुटका
संयुक्त पथकाची धडक मोहीम ; संबंधित मालकाविरुद्ध कामगार कायद्यान्वये कारवाई
धाराशिव,दि.१५ जून (जिमाका ) बाल व किशोरवयीन कामगारांना रोजगारापासून मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानांतर्गत धाराशिव शहरातील एका बेकरी गोडाऊनवर करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत दोन किशोरवयीन कामगार आढळून आले.त्यांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून संबंधित मालकाविरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
श्री.किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा बाल कामगार कृतीदल समिती, धाराशिव तसेच श्री.नितीन पाटणकर,कामगार उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या निर्देशानुसार आणि श्री.गोविंद गावंडे, सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ तसेच सुधारित अधिनियम, २०१६ अंतर्गत बालकामगार व किशोरवयीन कामगार मुक्त अभियान राबविण्यात आले.
या अभियानादरम्यान धाराशिव शहरातील समर्थ नगर परिसरातील बेंगलोर बेकरी गोडाऊनची तपासणी करण्यात आली.या ठिकाणी दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यांना तातडीने बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तसेच संबंधित मालकाविरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत निरीक्षण शेरा पारित करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
श्री.सचिन अरबट,दुकाने निरीक्षक तथा सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी नितीन गोरे (लिपिक, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय),वैभव गोरे,शरद ढवळे तसेच सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.याशिवाय जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे प्रतिनिधी अभय काळे,पोलीस प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग घेत संयुक्त कारवाई यशस्वी केली.
बालकामगार व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून नियमितपणे तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
******