Monday, 15 June 2026
पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय पथकाची धाराशिवमध्ये धडक तपासणी खाजगी सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांची पाहणी ; गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज
पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय पथकाची धाराशिवमध्ये धडक तपासणी
खाजगी सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांची पाहणी ; गर्भलिंग निदानास आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज
धाराशिव, दि.१५ जून (जिमाका) "गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा" (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम (Medical Termination of Pregnancy Act) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी सोनोग्राफी व एमटीपी (Medical Termination of Pregnancy) केंद्राला अलीकडेच अचानक भेटी देत सखोल तपासणी मोहीम राबविली.गर्भलिंग निदानास प्रतिबंध घालणे,लिंग निवडीच्या बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवणे आणि मुलींच्या जन्माचे प्रमाण संतुलित राखणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्य पर्यवेक्षीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक दि.२७ मे २०२६ रोजी आरोग्य भवन,आरोग्य सेवा आयुक्तालय येथे पार पडली होती.या बैठकीत माननीय आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील नोंदणीकृत केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित केंद्रांमधील रुग्ण नोंदवही, ऑनलाईन एफ-फॉर्म,केंद्रांचे नोंदणी प्रमाणपत्र,रेफरल स्लिप,आवश्यक दर्शनी फलक,पीसीपीएनडीटी कायद्याची पुस्तिका,सोनोग्राफी मशीनची नोंद तसेच एमटीपीशी संबंधित विविध कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात आली.यासोबतच केंद्रांच्या परवानगीविषयक बाबी आणि कायद्याचे काटेकोर पालन होत आहे का,याचीही तपासणी करण्यात आली.
यावेळी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय,पुणे येथील उपसंचालक (वि.ल.टो.) डॉ.दिगंबर कानगुले यांनी सांगितले की,पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून लिंग निवडीस प्रतिबंध करणे, गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणे आणि मुलींचे जन्म प्रमाण संतुलित राखणे हा अशा तपासण्यांचा मुख्य उद्देश आहे.या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्य व जिल्हास्तरावर नियमितपणे अचानक भेटी आणि तपासण्या आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणी मोहिमेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ.शिवाजी फुलारी,डॉ.विक्रांत राठोड,श्री.अमर सपकाळ तसेच संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.तपासणीदरम्यान संबंधित सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांचे डॉक्टर आणि प्रतिनिधीही उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोणतेही नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करत असल्याची अथवा कोणीही अनधिकृतपणे गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तत्काळ तक्रार नोंदवावी,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.यासाठी नागरिकांनी www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तसेच हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३- ४४७५ आणि १०४ वर संपर्क साधावा."बेटी बचाव" लिंग निवड रोखणे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,असेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
*****
