Wednesday, 17 June 2026
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहात अर्ज करणे बंधनकारक
धाराशिव दि.१८ जून (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत असून,वसतिगृहांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तींनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जिल्ह्यात सध्या एकूण ११ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय विभागातील विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ३० जून २०२६ पर्यंत,तर इयत्ता ११ वी,१२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
शासकीय वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.मात्र,गुणवत्तेअभावी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळू शकत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना उपलब्ध आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे.त्यामुळे स्वाधार योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
******