Thursday, 3 August 2017

पुस्तकी शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते


उस्मानाबाद, दि. 03:-  जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, उस्मानाबाद यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होते.  
            यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांचे नैराश्य त्यांचा एकलकोंडेपणा दूर होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी जास्तीत-जास्त प्रयत्न करुन पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर देखील शिक्षकांनी भर देऊन पुढील काळात यापेक्षाही जास्त जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा निकाल लागला पाहिजे असे प्रतिपादन करुन सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
            यावेळी पुर्वउच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी चे गुणानुक्रमे पहिले 5 शिष्यवृत्तीधारक, पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी चे गुणानुक्रमे पहिले 5 शिष्यवृत्तीधारक, शालान्त परीक्षा मार्च 2017 मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले 23 विद्यार्थी, जिल्हा परिषदेच्या एकूण 5 शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक, 100 टक्के गुण घेणारे खाजगी शाळेतील 6 विद्यार्थी, खो-खो खेळाची राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली प्रणीता पवार व स्वत:चा जीव धोक्यात घालून भावाला वाचवल्या बद्दल प्रगती गायकवाड या सर्वांना पुष्पहार, प्रशस्तीपत्र, डिक्शनरी व प्रशस्तीपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.    
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी केले. सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर आभार शिक्षणाधिकारी (निरंतर) कादर शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, सक्षणा सलगर, अस्मिता कांबळे, उध्दव साळवी, दत्ता देवळकर, कैलास पाटील, अभिमन्यु शितोळे, ज्ञानदेव राजगुरु उस्मानाबाद पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, लोहारा पंचायत समिती सभापती ज्योतीताई पत्रिके, उपसभापती कळंब भगवान ओव्हाळ, नगरसेवक सिध्देश्वर कोळी, शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन जगताप,  शिक्षणाधिकारी (मा.) औदुंबर उकिरडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व त्यांच्या पालकांनीही उपस्थिती दर्शविली होती.