उस्मानाबाद,दि.2:- प्रत्येक
गोष्ट डिजीटलायझेशन प्रमाणे बदलली असून येणाऱ्या काळात महसूलच्या अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी काळानुरुप बदल केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे यांनी उमरगा येथे 16 व्या महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
उमरगा येथे 16 व्या महसूल दिनानिमित्त
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अपर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी
प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उस्मानाबादे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश
श्रींगी आदिंसह सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती.
यावेळी
जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, येणारा काळ हा डिजीटल युगाचा असल्याने आपल्याला
संगणकीकृत ऑनलाईन डिजीटल सातबारे, महसूलचे सर्व दाखले डिजीटल स्वरुपात द्यावे लागणार
असल्याने काळानुरुप महसूलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनेदेखील बदलले पाहिजे,
त्याचबरोबर लोकसेवा हक्क कायदा आल्याने आपल्याला सर्व कामे वेळेत करावी लागणार
आहेत. त्यासाठी कामात गतीमानता आणून सर्व कामे पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी
सर्वांनी प्रयत्न करावेत.
त्यानंतर
महसूल विभागात काम करणाऱ्या प्रत्येक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ठ
कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महसूल विभागातील गुणवंत पाल्यांचा
सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना
डिजीटल सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक उमरगा उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांनी केले तर सुत्रसंचालन
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे
आभार उमरगा तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे यांनी व्यक्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, महसूल कर्मचारी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष रवि मोहिते आदिंनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास महसुल विभागातील
अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 