Monday, 19 June 2017

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक


उस्मानाबाद,दि.19:-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै- ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती लातूर विभागीय मंडळाद्वारे देण्यात आली आहे.
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाचे अधिकृत  www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वसाधारण विषयाची लेखी परीक्षा दि. 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी  व तोंडी परीक्षा,दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यानुभव विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दि. 10 जुलै ते 17 जुलै दरम्यान होईल.
शरीरशास्त्र , आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दि. 17 जुलै रोजी घेण्यात येईल. आऊट ऑफ टर्न परीक्षा दि. 3 ऑगस्ट रोजी होईल.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. विभागीय मंडळाव्दारे शाळांमध्ये अधिकृत वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यावरूनच विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी. खाजगी क्लासेस किंवा अन्य यंत्रणेने, अन्य संकेतस्थळारील, जाहिरातीसाठी वितरित केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी अवलंबून राहू नये, खाजगी यंत्रणेने छपाई केलेल्या जाहिरातीशी अथवा वेळापत्रकाशी मंडळाचा काहीही संबंध नाही.त्यामुळे परीक्षेपूर्वी मंडळाने अधिकृतरित्या प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे,असे आवाहन लातूर विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे.