4 मार्च रोजी उस्मानाबाद
मध्ये महिला व बालकांसाठी होणार महाआरोग्य शिबीर
उस्मानाबाद,दि.21:- गरजू रुग्णांचा शोध घेऊन
त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरीता 4 मार्च रोजी आयोजित महाआरोग्य शिबिरात
सर्वांनी शक्य ते सहकार्य करावे व स्वयंसेवक म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून
व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक
महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य
शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे, या महाआरोग्य
शिबिराच्या पूर्वतयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत
होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय
कोलते, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर
जिल्हाधिकारी पराग सोमण, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी करमरकर,
आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे
विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या
शिबिरात सुमारे 1 हजार 700 तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून त्यामध्ये पद्मश्री डॉ.
तात्याराव लहाने, डॉ. भोजराज, डॉ. रणजित जगताप, डॉ. रमाकांत पांडा, वैद्यकीय
शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे, प्रभारी आयुष संचालक डॉ. गोविंद खटी
यांच्यासारखे जागतिक स्तरावर ख्याती मिळवलेलेही डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हयाचे
पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी
पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले,
आमदार राहूल मोटे, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे,
आमदार दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हा
परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती अविदाताई जगताप, नितीन काळे, ॲड अनिल
काळे इत्यादींचे सहकार्य लाभले आहे.
शिबिराच्या
रचनेत एकूण तीन रुग्ण नोंदणी विभाग, नव्वद बाहयरुग्ण कक्ष, विशेष मोतीबिंदु,
ह्दयरोग, बालशल्यचिकित्सा, महिला कर्मरोग तपासणी, त्वचारोग, हाडांचे विकार, मासिक
पाळी संबंधी आजार, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा इत्यादी, चार सर्व
सोयीसुविधायुक्त दंततपासणी वाहने, मॅमोग्राफी व कर्करोग तपासणी वाहन, दहा
ॲम्ब्यूलन्स, दोन कार्डीयाक ॲम्ब्युलन्स, चार अग्नीशमन वाहने उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे सर्व गरजू रुग्णांना मोफत चष्मे, दातांची कवळी, औषधी, ज्या रुग्णांना
शस्त्रक्रिया, एम.आर.आय., सोनोग्राफी, एक्सरे, रक्त, लघवी तपासणी करावयाची आहे
त्यांना सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे. तसेच सर्वांना मोफत भोजन व पाणी
आयोजकांमार्फत दिले जाणार आहे.
या
शिबिरात उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, वाशी, कळंब, परंडा, भूम, उमरगा येथील
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक
आरोग्य केंद्रात दि. 25 फेब्रुवारी ते दि. 28 फेब्रुवारी 2018 रोजीपर्यंत 55 हजार
रुग्ण पूर्व तपासणी नोंदणी करण्यात आली आहे. रुग्ण पूर्व तपासणी नोंदणी लक्षात
घेता या शिबिरात 1 लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे.
या शिबिरांचा लाभ सर्व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक आणि महाआरोग्य शिबिर
आयोजन समितीने केले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. वडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अजिंक्य पवार, सर्व उपविभागीय
अधिकारी, डॉ. गलांडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खापर्डे,
डॉ. फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. थोरात, मुख्याधिकारी श्री. मनोहरे,
आपत्ती जोखीम व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल
काळे, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, नितीन भोसले
यांच्यासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, रुग्णालयांचे
अधिष्ठाता, प्राध्यापक आदिंची उपस्थिती होती.