Tuesday, 27 March 2018

अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानाची मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप

उस्मानाबाद दि.27:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता  बचतगटांना  90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादीचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे.
या योजनेसाठी सन 2017-2018 मधील उस्मानाबाद जिल्हयातील पात्र स्वयंसहायता बचतगटांना  शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ देण्याकरिता दिनांक 3 मार्च 2018 रोजी सामाजिक न्याय भवन उस्मानाबाद  येथे लकी ड्रॉ व्दारे 40 बचतगटांची लहान मुलींच्या हस्ते  चिठ्या काढून निवड करण्यात आली.  
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती मते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक, इतर कर्मचारी तसेच सर्व बचतगटांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
निवड झालेल्या सर्व 40 स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांचे सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती मते आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी अभिनंदन केले.