Tuesday, 27 March 2018

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेने हाती घेतला वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम

उस्मानाबाद दि.27:- जागतिक उष्णतापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, दुष्काळ, पाण्याचे दूर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असल्याची बाब जागतिक स्तरावर मान्य  झाली आहे.
राज्यातील वनक्षेत्र 20 टक्यावरुन 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र हा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना ही योजना लागू करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत वर्षभरात शुभेच्छा वृक्ष अंतर्गत गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करण्यात यावा. त्या कुटुंबाने मिळालेल्या झांडांना आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून त्यांचे संवर्धन करावे. शुभमंगल वृक्ष अंतर्गत दरवर्षी गावातील ज्या तरुणांचे विवाह होतात, त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभाशिर्वाद द्यावेत. आनंदवृक्ष अंतर्गत दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण होतात, गावातील ज्या तरुण/तरुणींना नोकऱ्या मिळतात आणि गावातील जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतात, अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडांची रोपे देऊन पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद द्यावेत. माहेरची झाडी अंतर्गत गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात त्या सासरी गेलेल्या असतात, त्यांना सासरी जावून झाडाचे रोप देणे अवघड असते. म्हणून या विवाहित कन्यांच्या माहेरच्या लोकांनी फळझाडांची रोपे देऊन त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत. आपल्या लेकीप्रमाणेच माया देऊन त्या झाडाची संबंधित कुटुंबाने संगोपन करावे, स्मृती वृक्ष अंतर्गत एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तींचे वर्षभरामध्ये निधन होते, त्या कुटुंबाला फळझाडाचे रोप देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी. हे कुटुंब झाडाच्या रुपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करेल, अशा प्रकारे हा उपक्रम राबविण्यासाठी समाजातील पर्यावरण प्रेमी व्यक्ती, दानशूर लोक आणि सीएसआर यांच्याकडुन देणगी  रुपाने फळझाडे मिळविता येतात, तसेच वन सामाजिक वनीकरन आणि एफडीसीएम यांच्यामार्फतदेखील वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दराने रोपांची उपलब्धता करुन घेता येईल. याशिवाय खासगी रोपवाटिकांमधुन देखील रोपांची उपलब्ध होऊ शकेल. यासाठी आवश्यक असणारा निधी ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून भागवावा. तसेच ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीमधून देखील हा खर्च भागविण्यास निधी उपलब्ध करुन घेता येईल.
मागील वर्षाचा दि. 1 जुलै ते चालू वर्षाचे 30 जून हे वर्ष गृहीत धरुन जन्म, विवाह आणि देवाज्ञा या प्रसंगाचे औचित्य साधून किती झाडांची रोपे वाटावे लागतील, याचा अंदाज ग्रामपंचायतींनी घ्यावा, त्यानुसार दि. 1 जुलै रोजी वर्षातून एकदाच रोपांचे वाटप करण्यात यावे.
वृक्षदिंडी अंतर्गत ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना वृक्षदिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी करुन घ्यावे.
दि 1 जुलै रोजी सभास्थानी वृक्षदिंडी आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात यावे. रोपांचे वाटप करण्यापूर्वी ज्या कुटुंबास रोपांचे वाटप करावयाचे  असेल, त्यांना किमान 4 ते 6 दिवस आधी टोकन दिले जावे. त्यामुळे कमी वेळात व्यवस्थितरित्या रोपांचे वाटप होऊ शकेल. संबंधीत कुटुंबांनी अशी झाडे दि. 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत लावल्याबाबत योग्य ती नोंद ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये वृक्ष नोंदवहीमधील फॉर्म क्र. 33 मध्ये ठेवावी.
याप्रमाणे योजना राबवून कुटुंबातील सुख दु:खाची आठवण वृक्षारोपण, संरक्षण, देखभाल व संवर्धनाव्दारे जपणे आणि त्यातून समृध्द पर्यावरण निर्मितीच्या दिशेने काम केले जावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अजिंक्य पवार यांनी केले आहे.