Thursday, 13 July 2017

जिल्हयात नव मतदारांची नोंदणी मोहीम स्वरुपात राबवा -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद.दि.13:- भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्‍याकरीता जिल्‍हयात दि. 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम राबवून या मोहिमेत उस्मानाबाद  जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त तरुण व पात्र प्रथम मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश उस्मानाबादचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तरुण व पात्र प्रथम मतदारांची मतदान नोंदणी संदर्भात आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद चेतन गिराशे,उपविभागीय अधिकारी उमरगा निलेश श्रींगी, तहसिलदार उस्मानाबाद सुजित नरहरे, तहसिलदार कळंब अशोक नांदगावकर, तहसिलदार तुळजापूर दिनेश झांपले, तहसिलदार लोहारा ज्योती पुजारे, तहसिलदार वाशी संदीप राजपूरे, तहसिलदार परंडा श्री.स्वरुप कंकाळ,शिक्षणाधिकारी(माध्यमिक)श्री.उकिरडे व जिल्हयातील विविध कॉलेजचे प्राचार्य आदींची प्रमुख्य उपस्थिती होती.
                        महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी नोंदणी दि. 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदारयादीत नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून घोषणापत्र भरून घ्यावे.सर्व कॉलेजमधून 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी करावी,एक ही विद्यार्थी नोंदणी पासून वंचित राहता कामा नये, मतदाराची दुबार नोंदणी होवू नये यादृष्‍टीने वय 21 पेक्षा जास्‍त असल्‍यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र भरून घ्यावे, दि. 22 जुलै 2017 या दिवशी जिल्‍हयातील सर्व महाविद्यालयात विशेष शिबिरे (Special Camp) आयोजित करण्‍यात यावेत व जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी यावेळी दिल्या.
            मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील प्रत्‍येक घरांना 31 जुलै 2017 पर्यंत घरोघरी भेट देवून  मतदारांची नोंदणी, वगळणी व दुरुस्‍तीसाठी अर्ज नोंदवून घ्यावेत,नवीन मतदारांच्‍या नोंदणी सोबतच बीएलओ यांनी घरोघरी भेट देताना मतदारयादीतील मतदार मयत असतील तर त्‍यांची माहिती घेवून तसेच स्‍थलांतरीत मतदारांचीही माहिती घेवून त्‍यानंतर योग्‍य चौकशीनंतर मयत, स्‍थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करावी, असेही यावेळी  निर्देश जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी यावेळी दिले.