Monday, 10 July 2017

दहा हजार रुपयाच्या कर्जाची हमी शासनाने घेतली असल्यामुळे त्याचे तातडीने सर्व बँकांनी वाटप करावे -पालकमंत्री दिवाकर रावते


उस्मानाबाद,दि.10:- ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा सन 2016-17 ची रक्कम जमा आहे त्या शेतकऱ्यांचा  खरीप पीक विमा सन 2017-18 चा हप्ता त्या  रक्कमेतून भरुन घेतला जावा, असे निर्देश परिवहन, खारभूमी विकास तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्ज /कर्जमाफी, जिल्हा वार्षिक योजना  2017-18  या वर्षांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री.रावते बोलत होते. यावेळी,  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री.व्ही.आर. जगदाळे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, सर्व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
                                 यावेळी पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमेची रक्कम जमा आहे व ज्या शेतकऱ्यांची  खरीप पीक विमा सन 2016-17 ची    रक्कम अद्याप ही वितरण झाली नाही  त्या शेतकऱ्यांच्या  रक्कमेतून खरीप पीक विमा सन 2017-18 चा पीक विमा हप्ता भरुन घेतला जावा, दहा हजार रुपयाच्या कर्जाची हमी शासनाने घेतली असल्यामुळे त्याचे तातडीने सर्व बँकांनी वाटप करावे.
                                  खरीप हंगाम सन 2017-18 साठीचे पीक कर्जाचे लक्षांक पूर्तता बँकांनी करावी, यासाठी पीक कर्ज वाटप मेळावे घ्यावेत, पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी समन्वय साधावा, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री. रावते यांनी दिल्या.
                                 यावेळी  पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हयातील शेतकरी कर्ज माफीचा आढावा घेतला. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2017-18 च्या योजनेच्या मंजूर नियतव्यय, अखर्चित निधी, दायित्व,उपलब्ध निधी आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला. नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व शाळा ई-लर्निंग करण्यासाठी यावेळी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.
                                 सहपालकमंत्री श्री.जानकर यांनी शासनाच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक राहिले पाहिजे, त्याचबरोबर जिल्हयात जलयुक्तच्या कामांना गती देवून कामे दर्जेदार व जलद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 करीता सर्वसाधारण क्षेत्राकरीता 148 कोटी 13 लक्ष, अनुसुचित जाती उपयोजना करीता 70 कोटी 79 लक्ष, आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्राकरीता उपयोजना करीता 2 कोटी 27 लक्ष 2 हजार नियतव्यय मंजूर असल्याचे यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे  यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. विविध विभागाचे विभाग प्रमुख आढावा बैठकीस उपस्थित होते.