Saturday, 15 July 2017

आजच्या युवा पिढीने उद्योजक बनावे


उस्मानाबद,दि.15:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता त्यामानाने नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे आजच्या युवा पिढीने व्यवसाय,उद्योगाचा मार्ग अवलंबला तर वाढत्या बेरोजगारीवर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन मिटकॉनचे जिल्हा व्यवस्थापक श्री.चव्हाण यांनी आज व्यक्त केले.
            कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री.चव्हाण बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे होते. स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक बालाजी मरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.उडाणशिवे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा प्राचार्य श्री.जाधवर, श्री.अहिरे आदींची प्रमुख्य उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्येक तरुणाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना कौशल्य विकासची जोड देवून त्यांना तंत्रशिक्षण दिले तर त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळून  आजचे तरुण चांगले उद्योजक होवू शकतात.यामुळे वाढत्या बेरोजगारीवर मात करता येवू शकतो.तंत्रशिक्षणामुळे तुम्ही मोठे उद्योजक होवून नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम देणारे उद्योजक बनावे.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप म्हणाले की, आजच्या युवा पिढीने स्वत:ला कमी न लेखता स्वत: ला सक्षम बनवून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचावे,आजची युवा पिढी घडली तर गाव,तालुका, जिल्हा, राज्य आणि देश घडेल त्यामुळे युवकांनी स्वत: सक्षम बनले पाहिजे.
            यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचा व उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक श्री.मरे यांनी केले.तर आभार प्राचार्य श्री.उडाणशिवे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अहिरे यांनी केले.यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.