बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभाकरिता
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका)- बि रसा मुंडा कृषी क्रांती योजना सन 2019-20 अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील सन 1992-93 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, शेतीची सुधारित शेती अवजारे, बैलजोडी, नवीन विहीर, पंपसेट इत्यादी बाबींचा 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येत होता.
ही योजना दीर्घकाळापासून राबविण्यात येत असल्यामुळे योजनेचे पुनर्विलोकन सन 2017-18 मध्ये करण्यात आले व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंपसंच (डिझेल/ विद्युत पंप), वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करणे, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन व तुषार सिंचन), परसबाग, पीव्हीसी/एच.डी.पी.ई. पाईप या बाबींना अनुदान देण्यात येते.
तरी अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावेत. ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित व छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी.
अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी केले आहे.
वृत्त क्रमांक-597
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभाकरिता
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका)- अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष घटक योजना सन 1982 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, नवीन विहीर, पंपसेट इत्यादी
बाबींचा 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येत होता. या योजनेचे पुनर्विलोकन सन 2016-17 मध्ये करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करणे, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक व तुषार) या बाबींना अनुदान देण्यात येते.
तरी अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावेत. ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित व छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी.
अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी केले आहे.
**********