Friday, 2 February 2018

जिल्हा कोषागार कार्यालयास कोषागार दिनी ISO मानांकन प्रदान





कोषागार कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे यश प्राप्त
- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
          उस्मानाबाद, दि.02 :-  कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत केली, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेशिवाय जादा तास काम करुन कार्यालयाचे रुपडे बदलून कार्पोरेट कार्यालयाचा दर्जा मिळवण्यासाठी जी मेहनत घेतली त्यामुळेच ISO मानांकन हे यश प्राप्त झाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी येथे केले.  
1 फेब्रुवारी 1962 साली लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना झाली, 1 फेब्रुवारी 1965 रोजी मुख्य वित्त व लेखा सेवा सुरु करण्यात आली त्याअनुषंगाने 1 फेब्रुवारी 2018 रोजी कोषागार दिन निमित्त कोषागार कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे, इतिहास संशोधक प्रा. सतिश कदम यांची प्रमुख  उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी मी ज्यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो त्यावेळी मी कोषागार कार्यालयास भेट दिली होती, त्यावेळी मी कोषागार अधिकारी यांना काही सुचना दिल्या त्या सुचनांचे पालन करुन कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करुन शासकीय कार्यालयाचे रुप बदलले, आज कोषागार कार्यालय हे जिल्हयातील आदर्श शासकीय कार्यालय असून येथील सेवा हया उत्तम दर्जाच्या आहेत. अभिलेख अद्ययावतीकरण, पेन्शन लायब्ररी यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यालयाने राबविले असून इतर कार्यालयांनीही मार्गदर्शन घेऊन आपल्या कार्यालयात देखील असे उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.   
कोषागार कार्यालयांतर्गत सर्व अभिलेख अद्ययावत करुन ते सहजपणे कोणत्याही कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील या पध्दतीने मांडणी केली आहे, कामानिमित्त येणाऱ्या सेवानिवृत्तीधारकांसह विविध कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना बसण्याकरीता व्यवस्था व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम कोषागार कार्यालयाने केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी बोलताना केले.
चलन व्यवस्थेत प्राचीन काळापासून होत असलेला बदल अधोरेखित करुन कोषागाराचे महत्व व निजाम काळातील कोषागार व आत्ताच्या कोषागार कार्यालयाशी संबंधित अनेक ऐतिहासिक दाखले याप्रसंगी बोलताना इतिहास संशोधक प्रा. सतिश कदम यांनी यावेळी दिले.
औरंगाबाद विभागातील पहिले ISO 9001:2015 मानांकन प्राप्त कोषागार कार्यालय म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ISO 9001:2015 प्रमाणपत्र  प्रदान करुन कोषागार कार्यालयाचा गौरव करण्यात आला.  

या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, मराठवाडा निवृत्तीवेतनधारक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास दानवे, एस.बी.आय. बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिलकुमार पांडे, ॲक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक किशोर पाटील, एच.डी.एफ.सी बँकेचे शाखा व्यवस्थापक महादेव मगे, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, सहाय्यक संचालक स्थानिक निधी व लेखा किरण घोटकर, अप्पर कोषागार अधिकारी आप्पासाहेब पवार, निलेश साखरे, कोषागार विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.