Friday, 5 January 2018

लोहारा येथे महा आरोग्य शिबिरात 2 हजार 475 रुग्णांची आरोग्य तपासणी




उस्मानाबाद,दि.5:- लोहारा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत महा आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 2 हजार 475 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
लोहारा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, सह्याद्री रुग्णालय उस्मानाबाद, आयुष, औषध विक्रेते संघटना, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ स्वयंसेवी संस्था, मॅग्मो आदींच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी या शिबिराचे उद्‌घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करुन करण्यात आले.
यावेळी  नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. चंद्रकला नारायणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव सुर्यवंशी, नगरसेवक सर्वश्री अभिमान भिमराव खराडे, श्यामराव नारायणकर, प्रताप घोडके, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे, तहसिलदार शोभा पुजारी, मुख्याधिकारी सोनम देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले, बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बी.एस.थोरात, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खापर्डे, डॉ.रमाकांत जोशी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजगुरु, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. गोविंद साठे, वैद्यकिय अधिकारी डॉ.आर.यु.सुर्यवंशी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग  रुग्णांची  मोफत तपासणी  व उपचार, रक्तातील साखरेची तपासणी, बी.पी.व ईसीजी तपासणी, कर्णबधिर रुग्णांची तपासणी, लहान मुलांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंत तपासणी, मनोविकार तपासणी आदी तज्ञ डॉक्टरांमार्फत या शिबिरात 2 हजार 475 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले.यामध्ये 1 हजार 355 महिलांची तर 1 हजार 120 पुरुषांची तपासणी करण्यात आली. या शिबिराबरोबरच  रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यामध्ये 5 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार श्री.चौगुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी मिळून शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले पाहिजे.त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती समजून सांगितली पाहिजे. त्याचबरोबर आ.चौगुले यांनी यावेळी 200 लोकराज्य सभासदांची नोंदणी स्वखर्चाने केली.
यावेळी शासकीय योजनांच्या लाभार्थींना आमदार श्री.चौगुले यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले.यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील रुग्ण मोठया संख्येने उपस्थित होते.