उस्मानाबाद,दि.3:- वृक्ष
लागवड, माता बाल मृत्यू, स्वच्छ भारत अभियान, अवयवदान, जलयुक्त शिवार अभियानाच्या
माध्यमातून जिल्हा सुजलाम्, सुफलाम् व दुष्काळमुक्त करुन जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन
सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी
आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सिध्दी 2017-संकल्प 2018
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग
सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, वन अधिकारी अशोक पवार,
जिल्हा अवयवदान समन्वयक डॉ. गजानन परळीकर,
जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. देशमुख, स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक रमाकांत गायकवाड आदींसह
जिल्ह्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या
आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्यानंतर सर्वांचे
स्वागत उस्मानाबादची ओळख जगभरात करुन देणारी जरबेरा फुले देऊन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी सुभाष चोले यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील
जलसाठ्याबरोबरच भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. या कामांमुळे
विहिरीच्या पाणीसाठयात 3 ते 3.50 मीटरने सरासरी वाढ झाली आहे.या अभियानातून सन
2015-16 या वर्षी जिल्ह्यातील 217 गावांची निवड करण्यात आली होती. या गावात
अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील
पहिल्याच वर्षी या अभियानांतर्गत एकवीस हजार पंचवीस कामे हाती घेण्यात आली होती,
ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून सन 2016-17 या वर्षात जिल्ह्यातील 191
गावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 16 हजार 795 कामे प्रस्तावित करण्यात
आली. निवडलेल्या सर्व गावात कामे सुरु करण्यात आली असून यातील 10 हजार 47 कामे
पूर्ण झाली आहेत तर प्रगतीपथावर 3 हजार 844 कामे आहेत. या अभियानांतर्गत शासकीय
यंत्रणा व लोकसहभागातून 14.73 लाख घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. या कामामुळे एक
संरक्षित सिंचन क्षेत्र 19 हजार 556 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. या
कामामुळे 6 हजार 744 टीसीएम पाणी साठा झाला, अशी माहिती दिली.
ते
म्हणाले की, सन 2017-18 मध्ये या अभियानांतर्गत
जिल्ह्यातील 178 गावांची निवड करण्यात आली असून यात 6 हजार 994 कामे प्रस्तावित
करण्यात आली आहेत. यात 4 हजार 215 कामांना प्रशासकीय मंजुरी असून कार्यारंभ आदेश 1
हजार 292 कामांना दिला असून 230 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मागेल त्याला शेततळे
योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 3 हजार 700 शेततळयाचे उदिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 1
हजार 653 शेततळे पूर्ण झाली असून चालू असलेली शेततळेचे कामांची संख्या 103 आहे,
यामध्ये अनुदान अदायगी केलेल्या शेततळयांची संख्या 1 हजार 649 इतकी आहे, यासाठी 6
कोटी 85 लाख रुपये निधी वितरीत करण्यात
आला आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
एकनाथ माले यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे
जिल्हयात राबविण्यात आलेले आधार ॲट बर्थ, ई-ब्लड बँक, टेलिमेडिसीन, मुलीच्या
जन्माचा जन्मोत्सव, महाआरोग्य शिबीर, अवयवदान या विशेष उपक्रमांबद्दल उपस्थित
पत्रकारांना माहिती दिली.
यानंतर, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी आरोग्य विषयक माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 1
वर्षापर्यंतच्या बाळाला आजारी असेलतर त्याच्या उपचारासाठी मोफत गाडीची सेवा पुरवली
जाते यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठी मदत होत आहे.
शासकीय रुग्णालयात 76 प्रसूती करण्यात येतात. त्याचबरोबर पल्स पोलिओ लसीकरण 99
टक्के मुलांपर्यंत पोहोचविले जाते. जीवनसत्व अ 96 टक्के बालकांना देण्यात येते.
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक मातांना
योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
वन अधिकारी अशोक पवार यांनी
वन विभागाच्या सादरीकरणात वृक्ष लागवडीची देखील प्रभावी अंमलबजावणी करुन सन 2017
मध्ये जिल्ह्याला सहा लाख तेवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये देण्यात आले
होते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त दहा
लाख पंच्च्यान्नव हजार 633 वृक्ष लागवड करण्यात आली, अशी माहिती दिली.
स्वच्छता अभियानाचे जिल्हा
समन्वयक रमाकांत गायकवाड यांनी जिल्हयातील स्वच्छता अभियानाची माहिती देताना स्वच्छ
भारत मिशन अभियान जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवून यशस्वी केले. यामुळे आज पायाभूत
सर्व्हेक्षण सन 2012 प्रमाणे जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला असून नियमित
शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, निगराणी समिती स्थापना, विद्यार्थी
न्यायालय, स्वछाग्रहींची नेमणूक, मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करणे,
आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उपलब्ध करुन देणे आदी संकल्प करण्यात येत
आहे, असे सांगितले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त
करताना अप्पर जिल्हाधिकारी श्री. सोमण म्हणाले की, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन
यांनी एकमेकांशी नेहमीच बौध्दिक आणि वैचारीक देवाण-घेवाण केल्यास त्यातून
सकारात्मक काम चांगल्या प्रकारे होवू शकते, त्यातूनच उस्मानाबाद जिल्हयाच्या
विकासाला निश्चितच हातभार लागलेला आहे आणि यापुढेही लागत राहील. प्रसारमाध्यमांनी
प्रशासनाला सकारात्मक कामांसाठी केलेल्या सूचनांचे नेहमी स्वागतच राहील.
प्रास्ताविकात श्री. सानप
यांनी सिध्दी 2017-संकल्प 2018 या उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली तर आभार
प्रदर्शनात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मनोगत व्यक्त करताना
उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासात पत्रकारांच्या योगदानाचे अनन्यसाधारण महत्व असून
यापुढेही प्रशासनातील अधिकारी व प्रसारमाध्यमे सकारात्मक भावनेने काम करतील व
त्यातून जिल्हयाची सकारात्मक ओळख सर्व देशाला होईल, असा विश्वास व्यक्त केला व या
उपक्रमासाठी उपस्थित सर्वांना धन्यवाद दिले. याशिवाय उपस्थित सर्वांना माहिती व
जनसंपर्कचे प्रकाशन लोकराज्य मासिक, महाराष्ट्र अहेड मासिक तसेच इतर काही पुस्तिका
भेट स्वरुपात देण्यात आल्या.