Monday, 29 May 2017

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


उस्मानाबाद,दि.29:- प्रत्‍येक शेतकऱ्यांच्‍या शेतास पाण्‍याची उपलब्‍धता करणे आणि पाण्‍याची कार्यक्षमता वाढवून पाण्‍याच्‍या प्रत्‍येक थेंबातून जास्‍तीत जास्‍त पीक उत्‍पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्‍म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेमध्‍ये समाविष्‍ट केली आहे. त्‍यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्‍त करण्‍यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आलेली आहे.या आज्ञावलीद्वारे दि.31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार आहेत,तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा,असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2016-17 पासून मराठवाडा विभागातील 8 जिल्हयांसाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 3 वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून सन 2017-18 वर्षामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई  योजनेंतर्गत 2.61 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 2.10 लक्ष हेक्टर क्षेत्रावर तर मराठवाडयात सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 60 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसविण्याचे उदिष्टय निश्चित करण्यात आलेले आहे. 

 सन 2017-18 साठी या योजनेअंतर्गत अनुदानाचे प्रमाण अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी 55 टक्‍के व इतर भूधारक शेतकरी 45 टक्‍के प्रमाण आहे. राज्‍य शासनाने सूक्ष्‍म सिंचन योजनेच्‍या अंमलबजावणीमध्‍ये अधिक सुटसुटीतपणा व सूसूत्रता आणून योजना पारदर्शकरित्‍या व अधिक प्रभावीपणे राबविण्‍याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनास सादर करावयाच्‍या कागदपत्रांची संख्‍या कमी करण्‍यात आली आहे.सूक्ष्‍म सिंचन संच बसविण्‍यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्‍यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्‍वीकृती करण्‍यासाठी ई-ठिबक आज्ञावली दिनांक 1 मे 2017 पासून सुरु करण्‍यात आली असून दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज स्‍वीकारण्‍यात येणार आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.