Saturday, 13 August 2016

“सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशन” झाली राज्यातील पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था



उस्मानाबाद दि.13:- उस्मानाबाद जिल्हयात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही  अंशी वाढले होते मात्र आता शासनाच्या विविध प्रयत्नांमुळे या संकटावरही उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने मात केली. याचीच प्रेरणा घेवून 2015-16 या वर्षात एका संवेदनशील महिला संपादिकेने आत्महत्याग्रस्त  शेतक-याची विधवा पत्नी आणि त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी सामाजिक मदत करण्याचा संकल्प केला आणि त्याच प्रयत्नातून स्थापन झाली सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशन ही 100 टक्के महिलांनी महिलांसाठी चालविलेली महिला सामाजिक संस्था. या महिला संपादिकेचे नाव आहे श्रीमती शीला उंबरे (पेंढारकर).
शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा शेतकरी पत्नी आणि त्याच्या कुटुंबासाठी मिळवून देण्यासाठी श्रीमती उंबरे प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नातून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी त्यांनी या महिलांना शासनाच्या योजनांच्या अभ्यासासाठी आणखी काय करावे लागेल असे विचारले. त्यावर जिल्हा माहिती अधिकरी सानप यांनी त्यांना लोकराज्य या मासिकाबाबत सविस्तर माहिती दिली, मार्गदर्शन केले आणि त्यातून ही संस्था 100 टक्के लोकराज्यमय करण्याचा निर्णय झाला.
लागलीच अध्यक्ष श्रीमती शीला उंबरे, उपाध्यक्ष डॉ. दीपिका सस्ते, नंदा पुलगडे, प्रिया गायकवाड, श्यामल उंबरे, शोभा बेदमुथा या पदाधिका-यांनी जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांच्याकडे एकूण 250 महिला सदस्यांच्या लोकराज्य  सभासदत्वाकरिता रूपये पंचवीस हजारांचा धनादेश सुपूर्द केला. अशा प्रकारे ही संस्था राज्यातील सर्वात  पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था बनली. संस्थेने यावेळी संकल्प केला की, संस्थेच्या प्रत्येक बैठकीत लोकराज्यातील लेखांचे नियमित वाचन केले जाईल आणि या गरजू विधवा महिलांना शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देण्यात येतील. 

        याप्रसंगी श्रीमती उंबरे यांनी या माध्यमातून जनतेला उस्मानाबादमधील या शेतकरी विधवा पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीकरिता पुढे यावे,त्यासाठी 9881633106 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच शासकीय योजनांच्या माहितीकरिता लोकराज्य या मासिकाचे जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या  महान्यूज या वेबपोर्टलला भेट दयावी,तसेच जय महाराष्ट्र व दिलखुलास हे कार्यक्रम आवर्जून पाहावे व ऐकावेत असे आवाहन केले.