Friday, 12 August 2016

जगप्रसिध्द कडकनाथ कोंबडीपालन प्रशिक्षणाचा सांगता समारंभ थाटात संपन्न

उस्मानाबाद,दि.12 – कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर, आत्मा व कृषी विभाग,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियानांर्तगत जगप्रसिध्द कडकनाथ कोंबडीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता समारंभ कृषी विज्ञान केंद्र येथे उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रमुख संजय बरीदे यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न्‍ झाला.
            या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा चे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूरचे प्रमुख पा्र.डॉ.सचिन सूर्यवंशी यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व पुरुष उपस्थित होते.
            या कडकनाथ कोंबडीपालन प्रशिक्षाणाचे आयोजन दि.9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2016 या तीन दिवसात दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते.या प्रशिक्षणास जिल्हयातील 60 लाभार्थीनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षणार्थीना यावेळी जंबोफिडर तसेच प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
            या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना संजय बरीदे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी बदलत आहे. हा बदल क्रांती घडवून आणणारा आहे.आपली शेती शेंद्रीय पध्दतीने करा, नवीन व्यवसायाकडे वळा. यावेळी प्रशिक्षणार्थी कौशल्या कटकटे, उस्मानाबाद. विकास चोबे, परांडा. श्रीमती बबिता कोळी, राजुरी व नेमिनाथ सोनवणे, लोहारा यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशिक्षणाचा आम्ही निश्चितच लाभ होईल असे निश्चयाने सांगितले.
            आत्मा चे प्रकल्प संचालक विजय लोखंडे यांनी शेतीविषयक मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतून नगदी पैसे मिळतील असे शेतीपूरक व्यवसाय उभारावेत.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती विषद केली  तसेच लोकराज्य मासिकाचे महत्व पटवून शेतकऱ्यांनी लोकराज्य वर्गणीदार व्हावे, असे आवाहनही केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक सचिन सूर्यवंशी यांनी कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ.अनिता जिंतूरकर, शास्त्रज्ञ (पशुविज्ञान) कृषी  विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी केले.