Tuesday, 7 July 2026

ई-पीक पाहणी जिल्ह्यात १६.२२ टक्के क्षेत्राची नोंद पूर्ण : शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारी महत्त्वाची डिजिटल नोंद

ई-पीक पाहणी जिल्ह्यात १६.२२ टक्के क्षेत्राची नोंद पूर्ण : शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारी महत्त्वाची डिजिटल नोंद शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन धाराशिव,दि. ७ जुलै (जिमाका ) खरीप हंगामातील पिकांची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध व्हावी, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसानभरपाई आणि पीक विमा प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये,यासाठी राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे.७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात १६.२२ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली असून,उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहेत. तालुकानिहाय प्रगतीमध्ये भूम तालुका २६.१३ टक्के नोंदींसह प्रथम क्रमांकावर असून,वाशी (२३.७२ टक्के) आणि परंडा (२१.२४ टक्के) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुळजापूर (१९.०१ टक्के),उमरगा (१७.२८ टक्के) आणि लोहारा (१५.६३ टक्के) या तालुक्यांनीही समाधानकारक प्रगती केली आहे. मात्र धाराशिव (१०.४४ टक्के) आणि कळंब (६.२२ टक्के) तालुक्यांमध्ये प्रगती वाढविण्याची आवश्यकता आहे. ई-पीक पाहणी ही केवळ ऑनलाइन नोंद नसून शेतकऱ्यांच्या शेतीचा अधिकृत डिजिटल पुरावा आहे. शेतात कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रावर लागवड झाली आहे, याची अधिकृत माहिती शासनाकडे उपलब्ध होत असल्याने पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई,विविध कृषी अनुदाने,कर्जसवलत,आर्थिक मदत तसेच भविष्यातील कृषी नियोजनासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताची ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले असून,उर्वरित क्षेत्राची नोंद लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविताना कोणतीही अडचण येणार नाही,तसेच जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध होऊन भविष्यातील कृषी धोरणे अधिक प्रभावीपणे आखण्यास मदत होणार आहे. ******