Tuesday, 7 July 2026

अँग्रीस्टॅक फार्मर आयडीशिवाय पीक विमा अर्ज होणार नाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलै अंतिम मुदत ; ई-पीक पाहणीही बंधनकारक

अँग्रीस्टॅक फार्मर आयडीशिवाय पीक विमा अर्ज होणार नाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलै अंतिम मुदत ; ई-पीक पाहणीही बंधनकारक धाराशिव,दि.७ जुलै (जिमाका) खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,३१ जुलै २०२६ ही नोंदणी व विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत आहे.यंदापासून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AgriStack Farmer ID) अनिवार्य करण्यात आला असून, ई-पीक पाहणीद्वारे पिकांची वेळेत नोंद करणेही बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते. योजनेची नोंदणी www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.मात्र,अर्ज करण्यासाठी AgriStack Farmer ID असणे अनिवार्य असून,ई-पीक पाहणीमध्ये संबंधित पिकांची नोंद वेळेत झालेली असणे आवश्यक आहे.त्यामुळे ज्यांनी अद्याप अँग्रीस्टॅक नोंदणी केली नाही,त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. ही योजना दोन्ही गटांसाठी ऐच्छिक असली, तरी कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेत विमा हप्ता कपात करू नये,यासाठी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा संबंधित कर्जदार शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग बंधनकारक समजला जाईल. सन २०२६-२७ पासून शासनाने सुधारित पीक विमा योजनेस मान्यता दिली आहे.या सुधारीत योजनेनुसार सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या नुकसानभरपाईचे निर्धारण पीक कापणी प्रयोगातून मिळणारे उत्पादन आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन या दोन्हींच्या आधारे करण्यात येणार आहे.तर इतर अधिसूचित पिकांसाठी नुकसानभरपाईचे निर्धारण नियमित पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आधारे करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे किंवा पेरणी करावयाची आहे,त्यांनी बाजरी व कापूस या पिकांसाठी १.५० टक्के,मका,मूग,उडीद,तूर व सोयाबीन या पिकांसाठी २ टक्के, तर खरीप कांदा या पिकासाठी २.५० टक्के शेतकरी हिस्सा भरून विमा अर्ज सादर करावा. विमा अर्जासाठी स्वयंघोषणापत्र, सातबारा व ८-अ उतारा,आधार कार्ड,AgriStack Farmer ID आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.ही कागदपत्रे घेऊन शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा संबंधित बँकेमार्फत पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यंदा अधिसूचित पिकांमध्ये बाजरी (विमा संरक्षित रक्कम ३२,००० रुपये प्रति हेक्टर,शेतकरी हिस्सा ४८० रुपये),सोयाबीन (६२,५०० रुपये,हिस्सा १,२५० रुपये),मूग (३०,००० रुपये,हिस्सा ६०० रुपये), उडीद (२७,००० रुपये,हिस्सा ५४० रुपये),तूर (४७,००० रुपये,हिस्सा ९४० रुपये),कापूस (६५,०००रुपये, हिस्सा ९७५ रुपये),मका (४०,००० रुपये,हिस्सा८०० रुपये) आणि खरीप कांदा (७५,०००रुपये,हिस्सा १,८७५ रुपये) या पिकांचा समावेश असून,संबंधित शेतकऱ्यांनी निर्धारित शेतकरी हिस्सा भरून वेळेत विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.अँग्रीस्टॅक फार्मर आयडी,ई-पीक पाहणी आणि वेळेत ऑनलाइन नोंदणी या तीन बाबींची पूर्तता केल्यासच विमा संरक्षणाचा लाभ सहज मिळू शकतो.नैसर्गिक संकटांपासून आर्थिक सुरक्षा मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे. *****