Wednesday, 26 September 2018

जिल्हयात आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आ. सुरजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा नुकतेच आमदार सुरजितसिंह ठाकूर  यांच्या हस्ते आणि माजी खासदार डॉ पद्मसिह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ संजय कोलते,भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,अनिल काळे, अॅड.व्यंकटराव गुंड, यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयुष्यमान भारत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे पाटील यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश करंजकर,स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राहुल वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ .धनंजय पाटील ,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ .गुरुराज थत्तेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, खंडेराव चौरे, नितीन भोसले, प्रविण पाठक, राहुल काकडे,इंद्रजित देवकते,ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील १लाख ३४ हजार कुटुंब २०११ साली झालेल्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणानुसार जनगणनेनुसार पात्र आहेत. तसेच  आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्नितरित्या राबविण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व जिल्हा स्त्री रुग्णालय अंगीकृत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दि. २० सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार लवकरच खाजगी रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहेत. जिल्हयातून आठ नगरपालिका क्षेत्रातील 153 वार्डातून 19 हजार 193 कुटुंबांची तर ग्रामीण भागातील 729 गावातून 1 लाख  12 हजार 891  कुटुंबांची  या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु ५ लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण,योजनेमध्ये १ हजार १०० च्या वर आजारांना मोफत शस्त्रक्रिया/उपचार, योजना पूर्णपणे संगणीकृत, इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, केंद्राचा ६०% तर राज्याचा ४०% हिस्सा, योजना पूर्णपणे नि:शुल्क, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश

(गुडघा,खुबा,कोपर प्रत्यारोपण), आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलाग्नितरित्या राबविण्यात येणार आहेत, अंगीकृत रुग्णालयात आयुष्यमान मित्रांची नेमणूक, मानसिक आजारावरील उपचारांचा समावेश, अधिक माहितीसाठी टोल फ्री
नंबर : १४५५५ / १५५३८८ ही या योजनेची वैशिष्टये आहेत. शेवटी आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी केले.