उस्मानाबाद,दि.28:- सर्व शासकीय यंत्रनांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करावीत,
कामे चांगले व दर्जेदार करुन घ्यावीत. तसेच जे विभाग वेळेत कामे पूर्ण करणार नाहीत
त्या विभागांचा निधी चांगले कामे करणाऱ्या इतर विभागाकडे वर्ग करण्यात येईल, असे निर्देश
परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री
दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन
2017-18 च्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. रावते बोलत
होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव
जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील,
सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी
अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र
खंदारे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष
चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
शिवाजी थोरात, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा नियोजन अधिकारी
सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले
की, प्रशासनाला गतिमान करण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवून त्याचे निराकरण करण्यासाठी
प्रयत्न करण्यात येतील.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा अधिकाऱ्यांनी गावात जावून
कामाचा आढावा घ्यावा.
जिल्ह्यातील वैद्यकीय
अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच बैठक घेवून रिक्त पदे भरले जातील,
महाआरोग्य शिबिरासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पिण्याच्या पाण्याची तपासणी
करुन ते पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाहावे नसेल तर त्या ठिकाणी हे पाणी पिण्यास
योग्य नाही अशा प्रकारचे फलक लावावे, अशी सूचना श्री. रावते यांनी यावेळी केली.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत
सन 2017-18 करीता 16 कोटी 29 लाख 20 हजार रुपये मागणी केली होती त्यापैकी 4 कोटी 67 लाख 80 हजार
रुपये मिळाले असल्याचे यावेळी सांगितले.बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतला
देण्यात येणारा निधी हा त्रस्त कुटुंबाच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात
यावा, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी
सुधाकर आडे यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे सादरीकरण केले. जिल्हा वार्षिक योजना सन
2017-18 साठी 148 कोटी 13 लाख निधी मंजूर होता. त्यापैकी वित्तीय तरतुद 115 कोटी
40 लाखाची झाल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर
यावेळी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती,
बळीराजा चेतना अभियान, किमान आधार भूत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत नियामक
परिषद बैठक, कर्ज माफी आदींचा यावेळी
आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनीही जिल्हा वार्षिक योजनाचे कामे वेळेत
पूर्ण करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.