उस्मानाबाद :- ग्राहकाला
त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने वस्तू आणि दर्जेदार सेवा मिळणे हा
ग्राहकाचा हक्क आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी, असे
प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज केले.
जिल्हा
पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण
सभागृहात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र ग्राहक
पंचायतचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, ग्राहक
पंचायतच्या सह संघटक मेघा कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष
अनिल पाटील, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य प्रा. संपतराव जळके,
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय
अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती. शिल्पा करमरकर, तहसिलदार सुजित नरहरे यांची प्रमुख उपस्थिती
होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे
पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना श्री. पाठक म्हणाले की, ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य
दराने आणि दर्जेदार सेवा किंवा वस्तू पुरविणे अपेक्षीत असते. परंतु असे न झाल्याने
ग्राहकाच्या हक्कांची पायमल्ली होते.
त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहून
खरेदी करावी आणि फसव्या जाहिरातींना बळी पडु नये. सध्या मोठया प्रमाणात
ग्राहकाकडून ऑनलाईन वस्तूंची खरेदी केली जात आहे, नेट बँकींग, एटीएम आदीचा वापर
वाढला आहे त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहावे व आपले हक्क समजून घ्यावे.
ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष डॉ.लाड यावेळी बोलताना
म्हणाले की, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध कायदे व नियम अस्तित्वात आहेत. ग्राहकांने वस्तु खरेदी करण्यासाठी जे मुल्य दिलेले आहे त्याच्या बदल्यात योग्य वजनात व
मापात वस्तु मिळणे ग्राहकाचा कायदेशिर
अधिकार व हक्क आहे. त्यासाठी ग्राहकाने
जागरुक राहून ग्राहक चळवळ उभी करावी व शोषणमुक्त समाजाची निर्मिती करावी, असे ही
त्यांनी सांगितले.
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य
प्रा. जळके यांनी सांगितले की, ग्राहकांने वस्तू खरेदी केल्यानंतर त्या
प्रत्येक वस्तुची पावती घ्यावी व जागरुक ग्राहक बनावे.
यावेळी
ग्राहक पंचायतच्या सह संघटक मेघा
कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वजने व मापे विभाग, भारतीय आयुर्विमा
महामंडळ, गॅस व राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक
व आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती. करमरकर यांनी केली. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे आणि पुरवठा विभागाच्या वर्षा शितोळे यांनी केले.
यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक मोठया
संख्येने उपस्थित होते.