Monday, 16 January 2017

जिल्हा स्वच्छता हागणदारीमुक्त कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन



            उस्मानाबाद,दि.16:-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत  जिल्हा परिषद उस्मानाबाद व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यामाने उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी आज येथील कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा स्वच्छता हागणदारीमुक्त कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .
            या कार्यशाळेस  मार्गदर्शन करताना  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते  म्हणाले की, प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे आवश्यक आहे ,  उघड्यावर शौच करणे हे थां‍बविण्यासाठी  तसेच प्रत्येकास घरात शौचालय बांधण्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे, यासाठी ग्रामस्थांमध्ये  जाणीव जागृती करणे आवश्यक आहे .  मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.  एमआरईजीएस, गट विकास अधिकारी , जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या  सहकार्याने हे उदिृष्ट पूर्ण करण्याचा मानस यावेळी  श्री. रायते यांनी बोलून दाखविला .
            या कार्यशाळेस संबोधताना सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की , स्वच्छ भारत अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी 470 गट बनविण्यात आले आहेत,  या गटांद्वारे जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी  संकल्प करण्यात आला असून  जिल्ह्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी  येणाऱ्या मुख्य अडचणी जाणून त्यावरील उपाय योजना शोधणे, शौचालय नसलेल्या कुटुंबाची माहिती घेणे,  संख्यात्मक उदिृष्टपूर्तीचा  व हागणदारीमुक्तीचा आराखडा तयार करणे , प्रेरकांची व प्रशिक्षकांची यादी तयार करणे , ओडीएपी चे नियोजन करणे , लोकप्रतिनिधींची यादी तयार करणे , मनुष्यबळ उपलब्धतेचा  तक्ता तयार करणे  इत्यादी बाबींची रुपरेषा त्यांनी यावेळी  स्पष्‌ट केली .
            या कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  गाडगे महाराजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक  उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर जाधव यांनी केले .

            या कार्यशाळेस  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,  टाटा अनुसंशोधन संस्थेचे समन्वयक श्री. मॅथ्यू ,  सचिन सुपेकर , प्रायमो संस्थेचे  प्रतिनिधी सचिन हंचळगे ,  जयंत देशपांडे,  सर्व विस्तार अधिकारी ,सर्व तालुक्यांचे  गट विकास अधिकारी व  टाटा संशोधन संस्थेचे  विद्यार्थी  आदी उपस्थित होते . ****