Thursday, 8 June 2017

जिल्हयाच्या विकासात्मक कामासाठी काटेकोरपणे नियोजन करा -पालकमंत्री दिवाकर रावते

         


                                                                       
उस्मानाबाद,दि.8:- जिल्हयात विकासात्मक कामे करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करुन सर्वांनी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या नियोजना संदर्भात जिल्हातील सर्व यंत्रणेच्या विभागप्रमुखासमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, कृषी विकास अधिकारी श्री.खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हयातील विकासकामांना सर्व यंत्रणांनी अधिक गती देवून जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा काटेकोर विनियोग करावा, कामे गुणवत्तपूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, केलेल्या कामांची तपासणी करण्यात येईल.कामाची  प्रशासकीय मान्यता वेळेत व्हावी यासाठी पाठपुरावा करा,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
झालेल्या कामांचा,चालू असलेल्या कामांचा मी स्वत: आणि सहपालकमंत्री श्री.जानकर हे वेळोवेळी परीक्षण करतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवारची कामे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी स्वत: सहपालकमंत्री महादेव जानकर हे त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून करणार आहेत. जिल्हयाच्या विकासाची जबाबदारी पालकमंत्र्याची असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधी आणण्यासाठी ज्या आवश्यक गरजा आहेत त्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करा यासाठी मी स्वत: व्यक्तिश:अर्थमंत्र्याकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करीन, असेही यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने कामे करत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला प्रथम प्राधान्य दयावे, जनसुविधा योजनेतून जास्तीत जास्त शेडची उभारणी करावी, जिल्हयाच्या विकासात्मक कामांची नवीन यादी तयार करावी, वृक्षलागवड करताना वड,पिंपळाची झाडे ही पडजमीन,स्मशानभूमी येथे लावावीत,  व्यायाम शाळेसाठी निधी देताना तो प्राधान्याने शाळा महाविद्यालयालाच दयावा, स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी एक एक गाव शंभर टक्के शौचालय बांधून पूर्ण करा, नागरिकांच्या मूलभूत गरजा नियोजनबध्द लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत,अशा सूचना यावेळी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री.रावते यांनी केल्या.
या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे  यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले.

यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नरेगा मधून ग्रामपंचायतचे बांधकामाचे प्रस्ताव तयार करुन त्यातून ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करावे व  नियोजन तयार करुन कामे करावीत अशी सूचना केली. यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या निधी व त्याचे खर्चाचे नियोजन याचा आढावा विविध विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हानियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.