Thursday, 8 June 2017

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टय तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री दिवाकर रावते

                   
                         
                                                                       
उस्मानाबाद,दि.8:- राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीककर्जाचे वाटप करून उदिष्ट तातडीने पूर्ण करावे,असे स्पष्ट निर्देश परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री.रावते यांचे अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पीककर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी  ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, कृषी विकास अधिकारी श्री.खोत, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे,अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.विजयकर आदीसह जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करावे यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी राष्ट्रीयकृत बँकेशी समन्वय साधून पीककर्ज वाटपाचे उदिष्ट साध्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटप व उदिष्टांबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटप आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की, जिल्हयातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेने आपल्या बँकेत पीककर्जाबाबत फलक लावून, एक खिडकी योजना सुरु करुन कर्ज वाटप सुरु करावे व आपल्या बँकेने केलेल्या कामाचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा,असे सूचित केले.