वृत्त क्र.323 दि.29 मे 2019
मंगळवार, 4 जून रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक
उस्मानाबाद,दि.29:-पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री श्री.अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवार, दि.4 जून रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ –मुंडे यांनी कळविले आहे.
वृत्त क्र.324
ग्रामीण भागात अजूनही माणुसकीचा झरा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा छावणी चालकांनी दिला मदतीचा हात
उस्मानाबाद,दि.29:- महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. विशेषतः उस्मानाबाद जिल्हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु उस्मानाबादमधील ग्रामीण भागातील तेर या गावात आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री. सतीशकुमार सोमाणी यांनी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा आधार देत चारा छावणीतच दोन शेतकऱ्यांच्या मुला-मुलीचा विवाह लावून देऊन ग्रामीण भागात माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
तेर व परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळावा म्हणून 21 मार्च रोजी चारा छावणी सुरु करण्यात आली. प्रारंभी 600 जनावरे या छावणीत दाखल झाली होती. आज या छावणीत 1 हजार 700 पेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत. चार छावणीतच शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी दूरदर्शन संचही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिसरातील 16 गावांचे शेतकरी छावणीतच मुक्काम ठोकून आहे.
या दुष्काळाची दाहकता पाहता छावणीतील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह पुढे ढकलत असल्याची माहिती छावणी चालक सतीश सोमाणी यांना समजताच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत छावणीतील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीचा विवाह लावून देण्याची तयारी दर्शविली. यातून ग्रामीण भागात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे दिसले व शेतकऱ्यांनी ठरविलेल्या दिवशीच म्हणजेच दि.29 मे रोजी, दुपारी 12.36 वाजता सोनाली जोतीराम एडके रा. भंडारवाडी व ज्ञानेश्वर पारप्पा देवकर रा. कार्ला तसेच निकिता बाळू देडे
रा. तेर व गणैश वहू गवळी रा. कळंब या दोन शेतकरी कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह लावून दिला.
या विवाह सोहळ्यास खासदार ओमराजे निंबाळकर, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, आयोजक व छावणी चालक सतीशकुमार सोमाणी, माजी सरपंच महादेव खटावकर, तहसिलदार विजय राऊत, अनिल काळे, नितीन शेरखाने, जि.प.सदस्य बाळासाहेब जाधवर, हनुमंत नागटिळक, बी.एन डोंगरे यांच्यासह हजारो वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला.
****
वृत्त क्र.325 दि.29 मे 2019
शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड
बँक खात्याशी तात्काळ मॅप करुन घ्यावे
उस्मानाबाद,दि.29:- ज्या पात्र शेतकऱ्यांना हरभरा व तुरीचे अनुदान अद्याप आधार मॅप खात्यावर जमा झालेले नाही, त्यांनी सात दिवसात ज्या सब एजंट संस्थेकडे ऑनलाइन नोंदणी केली त्या ठिकाणी आधार कार्ड बँक खात्याशी मॅप करून त्याची माहिती कळवावी.
ज्या शेतकऱ्यांनी हंगाम 2017-18 मध्ये हरभरा पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी केली होती मात्र ज्या शेतकऱ्यांना हरभरा व तूर विक्रीसाठी ऑनलाइन मेसेज गेला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे.
ढोकी, उस्मानाबाद, नळदुर्ग, कळंब, वाशी, भूम, लोहारा येथील तूर-हरभरा केंद्रांवर नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी नोंदणी केलेल्या सब एजंट संस्थेकडे 30 तसेच जिल्हा मार्केटिंग कार्यालय, उस्मानाबाद येथे उपलब्ध आहे. आधार मॅप खाते नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान परत जात आहे.
तालुकानिहाय हरभरा अनुदान वितरित झालेली यादी पाठवलेली आहे. तसेच आधार कार्ड इनऍक्टिव्ह व आधार खात्याशी मॅप नसल्यामुळे अनुदान परत गेलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले आधार कार्ड बँक खात्याशी मॅप करण्याबाबत बँकेत जाऊन तातडीने कार्यवाही करून घ्यावी. सात दिवसात आपल्या आधार मॅप खात्याची माहिती अपेक्षित आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाहीसाठी प्रधान कार्यालयास आपली माहिती कळविण्यात येईल.
तरी सर्व हरभरा-तूर अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आधार मॅपिंगबाबत पूर्तता करून जिल्हा मार्केटिंग कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.
*****
वृत्त क्र.326 दि.29 मे 2019
उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक नियोजन, ही काळाची गरज
उस्मानाबाद,दि.29:- सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे पण त्यातही पाण्याचा दुष्काळ भीषण आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या आधारे पीक नियोजन करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद) चे प्रमुख प्राध्यापक डॉ. राजेश पुराणिक यांनी केले .
दि.28 मे 2019 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कार्य हस्तांतरण व लोकसहभागाने देखभाल व दुरुस्ती बाबत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. देशपांडे, डॉ. नारखेडे, श्री. टेकाळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. ए. कांबळे, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे चे कार्यकारी अभियंता श्री. ए. जगताप, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकारी श्री. गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.शेळके हे उपस्थित होते.या सत्रात सुमारे 185 शेतकरी बांधवांनी व 58 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अमूल्य मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकाचे नियोजन, व्यवस्थापन करीत त्यासोबत जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालनही करण्याबाबत आग्रह केला.
डॉ. राजेश पुराणिक यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या कामांचे हस्तांतरण व देखभाल दुरुस्ती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर जलसंपत्तीवर येणारा ताण यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सर्व शेतकऱ्यांनी सहकार्याने व जागृतपणे पडलेला पाऊस जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साठ्यामध्ये पुरेपूर अडविण्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन
केले तसेच शेतकरी बंधूंना त्यांच्या आवारात, शिवारात भविष्यात आवश्यक असणारे योजनांची शासन दरबारी वेळोवेळी दखल घेणे आणि मांडणीबाबतही प्रबोधन केले.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांचे अधिकारी श्री. गायकवाड यांनी पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत वेगवेगळ्या खोलीवर व स्तरावर जपण्याच्या प्रक्रियेबद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे प्रतिकूल परिणामांचे विश्लेषणही केले. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या रिचार्ज शाप्टची कामे न झाल्याबाबत सांगितले असता त्यांनी भविष्यात त्यांची कामे पूर्ण करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.
जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे यांनी जलयुक्त शिवार अभियान 2015-16, 2016-17,2017-18, 2018-19 या वर्षांमध्ये झालेल्या सर्व यंत्रणा जसे की कृषी, भूजल सर्वेक्षण, जिल्हा परिषद व जलसंधारण यांनी केलेली सर्व कामे व निर्माण झालेल्या पाणीसाठयाबद्दलची आकडेवारीसह माहिती उपस्थितांना दिली. सर्व शेतकरी बंधूंना या योजना हस्तांतरित करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहनही केले. भविष्यात देखभाल दुरुस्तीसाठी काय काय तांत्रिक समस्या येऊ शकतात, याचेही त्यांनी उदाहरणासहित मार्गदर्शन केले. वेळीच्या वेळी देखभाल दुरुस्ती केल्यानंतर होणाऱ्या फायद्याबाबतही त्यांनी उपस्थित शेतकर्यांना समाधानकारक माहिती दिली.
जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद येथील प्रा. श्री. टेकाळे यांनी गहू, ऊस, हरभरा व इतर पिकांना त्या त्या कालावधीत आवश्यक असणाऱ्या पाणी देण्याच्या वेळेबाबत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. तसेच या सर्व पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब कसा करावा, पाण्याचे होणारे अनावश्यक बाष्पीभवन होऊ न देता पाण्याची बचत कशी करावी, याबाबतची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी पाण्याच्या ताळेबंदविषयी माहिती सांगताना जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16, 2016-17, 2017-18 मधील पूर्ण झालेल्या सर्व कामांची व जलपरिपूर्ण गावांचीही माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. शेळके यांनी केले तर आभार प्रा. नारखेडे यांनी मानले.
****