उस्मानाबाद.
दि.21:- साहित्य हे मूल्यांची जपणूक करण्यासाठी असते. साहित्य हे मूल्यांचा संघर्ष
असते ते करमणूकीचे साधन नाही तर माणसाला माणूसकीच्या पातळीवर नेण्याचे काम साहित्य
करते. ग्रंथ चळवळ ही मूल्यांची चळवळ आहे त्यामुळे मूल्यांना संवर्धित करणारे ग्रंथ
असावेत,असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी आज केले.
आनंदनगर येथील
सांस्कृतीक सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,
उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित ‘ग्रंथोत्सव- 2017’ च्या उद्घाटन प्रसंगी श्री. जेष्ठ साहित्यिक भास्कर
चंदनशिव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,
उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, सहायक
ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी
यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी
पुढे बोलताना श्री.चंदनशिव म्हणाले की, पुस्तक व ग्रंथ यातील अंतर ओळखणे
महत्त्वाचे आहे. मूल्यांची पाठराखण करणारे पुस्तक हे ग्रंथ पदाला जावू शकते.
स्वातंत्र्य, समता, बन्धुताची पाठराखण करणारे पुस्तक ग्रंथपदापर्यंत जावू शकते.अशा
प्रकारचा महोत्सव जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा आपण तो ग्रंथाचा महोत्सव साजरा करत
नसतो तर तेव्हा आपण माणसाच्या माणुसकीचा महोत्सव साजरा करतो.
आजचा काळ हा संभ्रमाचा आहे एकीकडे डिजिटल तर एकीकडे नवतेचा
स्वीकार करायचा का नाही हा संभ्रम आहे. शिक्षण व्यवस्था, ज्ञानव्यवस्था,
अर्थव्यवस्था असा सगळा संभ्रमाचा काळ आहे.
अशा संभ्रमाच्या काळात गावेगावी चांगले ग्रंथ निघावेत, मूल्यांना संवर्धित करणारे
ग्रंथ असावेत, माणसाची माणुसकी जोपासणारे असावेत, अशी चळवळ गावेगावी उभी राहावी,
या चळवळीच्या शिवाय दुसरे काही करण्याची गरज नाही, खऱ्या अर्थाने अशा ग्रंथ
चळवळीची गरज आहे, असे मतही श्री.चंदनशिव यांनी यावेळी व्यक्त केले.
डिजिटल युगात असा प्रयत्न अतिश्य महत्त्वाचा आहे, विचारात
वाढ होण्यासाठी, पुस्तक हे सतत व कायम राहणारा संग्रह आहे त्यामुळे ते वाढले पाहिजे,
असे उपजिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथ
महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त येथील जिजाऊ चौक बार्शी
नाका ते सांस्कृतिक सभागृह आनंदनगर पर्यंत
ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत पालखी मध्ये ‘गाथा व ज्ञानेश्वरी’
हे ग्रंथ ठेवण्यात आले होता. यावेळी ग्रंथदिंडीत तहसिलदार सुजित नरहरे, सहायक
ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, जिल्हा
ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी आदीसह
मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
शहरातील जिजाऊ
चौक बार्शी नाका या ठिकाणहून ग्रंथदिंडी निघाली. या ग्रंथदिंडी मुळे शहर ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’
च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनीचे उपजिल्हाधिकारी
शिरिष यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक
अ.मा. गाडेकर, जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी
आदींची उपस्थिती होती. पुस्तक विक्रीचे 14 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये
प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिध्द पुस्तक
विक्रेते यांच्या बरोबरीने शासकीय मुद्रणालयाची शासकीय प्रकाशने आणि माहिती व
जनसंपर्कचे लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, महामानव इत्याइी पुस्तकांच्या विक्री
स्टॉलचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक
जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.सुर्यवंशी यांनी केले व या ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबाबतची
भूमिका विषद केली तर सूत्रसंचलन श्री. अभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री.शेंगुलवार, जिल्हा
माहिती अधिकारी श्री.सानप व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री.सुर्यवंशी यांनी
मनोगत व्यक्त केले. आभार ग्रंथालयाचे श्री. डेंगले यांनी मानले. कार्यक्रमास मोठया
प्रमाणात साहित्यिक, विद्यार्थी उपस्थित होते.
बुधवार दि.22 नोव्हेंबर 2017
रोजी सकाळी 11 ते 1 या दरम्यान
कथाकथन हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2
ते 3 वाजता स्पर्धा परीक्षा एक आव्हान हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप
दुपारी 3 ते 5 या कालावधीत माजी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग श्री.लक्ष्मणराव
ढोबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.