Sunday, 11 September 2016

पालक सचिवांकडून आढावा बैठकीसह पीक परिस्थितीची पाहणी



उस्मानाबाद.दि.9:- प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा पालक सचिव  उस्मानाबाद जिल्हा श्री. महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेऊन  संबंधित अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना दिल्या . या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते , अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते . आढावा बैठकीत प्रारंभी महेश पाठ‍क यांनी जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबतची माहिती संबंधितांकडून घेऊन योग्य त्या सूचना दिल्या . याबरोबरच जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान , पीक विमा योजना , आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचे सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे,आरोग्य पत्रिका , आधार कार्ड , जलयुक्त शिवार अभियान व सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.या बैठकीनंतर पालक सचिव महेश पाठक यांनी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील परतापूर व मस्सा या गावी शेतातील सोयाबीन पीकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली  व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या पीक परिस्थिती पाहणी  वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , कृषी विभागाचे अधिकारी , ग्रामस्थ व  शेतकरी उपस्थित होते .