उस्मानाबाद, दि. 20:- सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या
माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता उस्मानाबाद तालुक्यातील
महसूलच्या विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारीही उतरले असून
ग्रामस्थांच्या बरोबरीने त्यांनीही हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदान केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय
अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे, राहूल पाटील, अभय मस्के, राजकुमार
माने, नायब तहसिलदार एन. बी. जाधव, संतोष पाटील, प्रियंका लोखंडे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
तालुक्यातील कावलदरा येथे शनिवारी महाश्रमदान
घेण्यात आले. पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी
‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन
करण्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे 92 गावांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे.
यापैकी कावलदरा तांडा येथील डोंगर माथा ते पायथ्यावर दि. 21 एप्रिल रोजी महसूल
विभागाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांसमवेत महाश्रमदान करण्याचे नियोजन
प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार सुजित नरहरे, राहूल पाटील तसेच पाणी
फाउंडेशनचे उस्मानाबाद समन्वयक उमेश मडके, विलास येवले, अशोक कदम व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आले.