Friday, 17 November 2017

विकासाबद्दलची संकल्पना माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे



उस्मानाबाद.दि.17:- विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.कावेरी बने यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त माध्यमासमोरील आव्हाने या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रा.कावेरी बने  बोलत होत्या.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना प्रा. कावेरी म्हणाल्या की, विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.ज्यांच्यापर्यंत इंटरनेट  सुविधा पोहचत नाही त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम प्रिंट माध्यमांनी करावे. राजकारणी व उद्योगपतीकडे माध्यमांचे जेवढे लक्ष असते तेवढेच लक्ष माध्यमांनी समाजातील सर्वसामान्य लोकांकडे असणे गरजेचे आहे. पत्रकारांची भूमिका महत्वाची असून माध्यम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा उपयोग प्रभावीपणे पत्रकाराने करावा.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रणदिवे यांनी माध्यमासमोरील आव्हाने, पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य तसेच पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.मोरे यांनीही उद्योजकता या विषयावर पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर निसर्गोपचार पध्दती व पा्रत्याक्षिक आरोग्य शिबिरात डॉ.मनोज साळुंके व डॉ.गवळी  यांनी पत्रकरांना धावपळीचे जीवन जगावे लागत असल्याने आहार कसा असावा तसेच विविध शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय व व्याधी होऊच नये म्हणून घेण्यात येणारी काळजी यावरील आयुर्वेदिक उपचार पध्दती  याविषयी  सविस्तर माहिती दिली.


प्रास्‍ताविक व आभार जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. यावेळी राष्‍ट्रीय पत्रकार दिनाच्‍या आयोजनाबद्दल माहिती दिली. जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, देवीदास पाठक, शिला उंबरे, श्री.जी.बी.रजपूत, गिरिष जव्हेरी, पांडूरंग मते, नरसिंग खिचडे, प्रशांत कावरे, संतोष जाधव, हुंकार बनसोडे, प्रमोद राऊत, भाऊसाहेब अणदुरकर, अरुण गंगावणे, शाहरुख सय्यद, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत कुलकर्णी, दत्तात्रय गायके, आकाश नरोटे, बिभीषण लोकरे, महेबुब फकीर, गंगावणे राजकुमार, रामेश्वर डोंगरे, धनंजय पाटील, योगेश कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, निमजे ज्योतीराम, संजय रेणुके आदीसह जिल्हृयातील सर्व पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.