Tuesday, 7 March 2017

चला स्त्रीशक्तीचा सन्मान वाढवूया- डॉ.प्रशांत नारनवरे



उस्मानाबाद.दि.7:-आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनाच्या टप्प्यावर स्त्री या घटकाची अत्यंत महत्वाची आहे. याबाबतची कृतज्ञता म्हणून 8 मार्च जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलाप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करून त्यांचा सन्मान  करून समाज प्रबोधन घडविण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी स्त्री शक्तींचा सन्मान वाढवूया असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो,या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयातही  हा  दिवस  सर्वांनी मिळून उत्साहाने,विविध उपक्रमांनी साजरा करावा याकरिता जिल्हाधिकारी काया्रलयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, सरकारी अभियोक्ता श्री.शरद जाधवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बी.एम. थोरात, महिला व बालविकास अधिकारी वैभव सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पोलीस उपअधीक्षक श्रीमती जहागिरदार हे उपस्थित होते.
डॉ.नारनवरे यांनी बैठकीत प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला कक्षाची स्थापना करावी,महिलांच्या गरजांविषयी, समस्याविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता वाढीस लागण्यासाठी जनजागृती करावी, प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी अशा सूचना दिल्या.
डॉ.नारनवरे पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ज्या ठिकाणी महिला स्वच्छतागृहाची  कमतरता असेल त्या ठिकाणी त्यांची पाहणी करुन तात्काळ स्वच्छतागृहाची उभारणी करावी, महिलांना महिला विषयक कायदयांची माहिती मिळावी याकरिता मोठया प्रमाणावर कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, सर्व महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात यावेत, त्याचबरोबर प्रत्येक शाळा, महाविद्यालये या ठिकाणी "निर्भया पेटी" बसविण्यात याव्यात आणि त्या बसविल्या आहेत की नाही याची शिक्षणाधिका-यांनी  खात्री करुन तसा अहवाल सादर करावा.
याशिवाय समाजात, शासनाच्या सेवेत उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या महिलांचा यथोचित सत्कार व्हावा, महिलांविषयी संवेदनशील राहून त्यांना सामाजिकदृष्या भावनिक आधार दयावा,उत्कृष्ट काम करण्याचा महिलांना अधिक चांगल्या कामासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी यावेळी  केले.

या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.वैभव सूर्यवंशी, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी  अमित घवले, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस.बी शेळके,परिविक्षा अधिकारी श्री.व्ही.जी.शिंदे,परिविक्षा अधिकारी एम.ए.पाटील, संरक्षण  अधिकारी  श्रीमती  शीतल  कोठावळे, डॉ.राहूल वाघमारे आदि  उपस्थित होते.