Tuesday, 21 April 2026
शक्ती सदन योजना : संकटग्रस्त महिलांसाठी आधार, सुरक्षा आणि नवजीवनाची दिशा”
विशेष वृत्त
वृत्त क्र.३०३
दि.२१ एप्रिल २०२६
शक्ती सदन योजना : संकटग्रस्त महिलांसाठी आधार, सुरक्षा आणि नवजीवनाची दिशा”
धाराशिव दि.२१ एप्रिल (जिमाका) महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सुरक्षित,सन्मानजनक जीवन देण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणारी “मिशन शक्ती” ही महत्त्वपूर्ण योजना आहे.याच मिशनअंतर्गत “शक्ती सदन योजना” ही उपयुक्त व संवेदनशील योजना कार्यरत असून,संकटात सापडलेल्या महिलांसाठी ही एक आशेचा किरण ठरत आहे.
शक्ती सदन योजना ही कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार,बेघरपणा किंवा सामाजिक आधार नसलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा आणि पुनर्वसनाची हमी देणारी योजना आहे.समाजातील दुर्बल व वंचित महिलांना केवळ संरक्षणच नव्हे,तर स्वावलंबनाचा मार्ग दाखविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
धाराशिव जिल्ह्यात सध्या दोन शक्ती सदन कार्यरत असून,त्यामध्ये जिजामाता बहुउद्देशीय महिला मंडळ,लातूर संचलित शक्ती सदन,धाराशिव आणि श्री साई सेवाभावी संस्था संचलित शक्ती सदन, हडको तुळजापूर,ता.तुळजापूर या केंद्रांद्वारे प्रभावीपणे सेवा दिली जात आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १८० पीडित महिलांना आणि त्यांच्या १२ वर्षांखालील मुलांना सुरक्षित निवारा,संरक्षण आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संकटग्रस्त,अत्याचारग्रस्त,बेघर किंवा आधारहीन महिलांना सुरक्षित जीवन देणे.त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करणे.महिलांना स्वावलंबी बनविणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
शक्ती सदन अंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात.
निवारा (Shelter) : सुरक्षित व तात्पुरता किंवा दीर्घकालीन निवास.अन्न व वस्त्र : मूलभूत गरजांची पूर्तता.आरोग्य सेवा : वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचार. समुपदेशन : मानसिक आधार व मार्गदर्शन.कौशल्य प्रशिक्षण : शिलाई, संगणक व इतर प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबन. पोलीस मदत : कायदेशीर सहाय्य व संरक्षण देण्यात येते.
शक्ती सदन योजना ही केवळ निवारा देणारी योजना नसून,महिलांना नव्याने उभे राहण्याची संधी देणारी परिवर्तनाची चळवळ आहे.जिल्ह्यात या योजनेमुळे अनेक महिलांना सुरक्षितता,सन्मान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला आहे. एकूणच,“शक्ती सदन योजना” ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढून नवजीवन देण्यासाठी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
*******