वृत्त क्रमांक 656 दि.23 सप्टेंबर, 2019
विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहितेचे पालन करा
-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.23(जिमाका): भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकची जाहिर करण्यात आली असून शनिवार (दि.21) पासून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी आदर्श आचार संहितेचे कोटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
येथील प्रशासकीय इमारतीतील डी.पी.सी. सभागृहात विभाग प्रमुख व नोडल अधिकारी अचार संहिता यांच्या बैठकीत श्रीमती मुधोळ-मुंडे या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिाकरी विठ्ठल उदमले, चारुशिला देशमुख, रामेश्वर रोडगे आणि मनिषा राशिनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनाचे तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र असलेले फ्लेक्स, बॅनर, पोस्टर तात्काळ काढून टाकावेत. तसेच सार्वजनीक मालमत्तेवर लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती ही तात्काळ काढण्यात याव्यात. तसेच भूमिपूजन, उद्घाटनाच्या कोनशिला झाकुन ठेवाव्यात. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करु नये किंवा त्यांना मदत करु नये. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत कोणतीही निवीदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यारंभ आदेश देणे किंवा नवीन काम सुरु होणार नाही याची सर्व संबंधीत विभागानी दक्षता घ्यावी. परंतू टंचाई संबंधीत कामे परवानगी घेवून करता येईल. तसेच विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. तसेच सदर कामे करतांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची काळजी घ्यावी, असे ही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.
यावेळी जिपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आदर्श अचार संहितेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****
वृत्त क्रमांक 657
बालशक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता अर्ज मागणी
उस्मानाबाद,दि.23(जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार- ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये वैयक्तिक पुरस्कार- मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतनात अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर- बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये संस्था पूर्णता: शासनाच्या निधीवरच अवलंबून नसावी. तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बालशक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचा अर्ज हे www.nca.wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची अंतीम मुदत दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. ती आता दि. 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाल विकास महिला व बालकल्याण विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.