Monday, 14 January 2019

लोकसंवाद’ कार्यक्रमात कौडगावच्या अरुण जाधव या शेतकऱ्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट बांधावर संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ 




उस्मानाबाद, दि. 14 :  पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला.
आज सोमवार 14 जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसोबत संवादाला सुरुवात केली. शेतकरी बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी चर्चेला सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुक्तपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमादरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील  पॉलिहाऊस शेडनेट या योजनेचा लाभार्थी शेतकरी अरुण जाधव व त्याच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बांधावर संवाद साधला. यावेळी श्री.अरुण जाधव यांची पत्नी प्रभावती अरुण जाधव, मुलगी साक्षी  आणि मुलगा प्रतीक हे उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याचे यश आणि साक्षात मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधत असलेला संवाद अनुभवण्यासाठी गावातील सरपंच प्रतिभा सुतार, प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत थोरात, सचिन चव्हाण, सोमनाथ नाईकवडी, नरसिंग थोरात,छगन कापसे, नवनाथ थोरात, ॲङ अनंत धंगेकर, संजय कुलकर्णी, ग्रामसेवक व्ही. डी. मटके,  तलाठी  पी. पी. गुळवे, कृषी सहाय्यक डी. टी.सिनगारे हेदेखील उपस्थित होते.
  जिल्ह्यातील जवळपास पंधरा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातील व्हीसी रूम मध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभाबाबत चर्चा केली. या लाभार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील गणेश नरवडे(पळसप), सोमेश्वर बसवेश्वर शेट्टे(कोंड),  शरद शेळके (खामसवाडी), संजय पवार(पाडोळी), विजय रोकडे(काटगाव), अण्णासाहेब कोळेकर (अंबेजवळगा) तसेच कोंडगाव येथील अरुण जाधव या शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकऱ्यांसमवेत इतरही काही शेतकरी या व्हीसी दरम्यान उपस्थित होते.
 राज्य शासन योजना आखतं, तसेच त्याची अंमलबजावणी करतं. या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना खरोखरचं किती लाभ मिळाला आहे हे समाजवून घेणं, जर काही अडचणी आल्या असतील तर त्या कशा दूर करता येतील याची माहिती घेणं हे महत्वाचं वाटतं. म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. दुष्काळी परिस्थितीची झळ जास्त बसलेल्या मराठवाड्यापासून आपण चर्चेला सुरुवात करुया असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी सर्वप्रथम चर्चा केली.
आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यातील पॉलिहाऊस, शेडनेट, डाळ मिल उद्योग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, हरितगृह, सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी योजनांमधून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांना झालेला लाभ तसेच येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेतला.  
या संवादादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळे या योजनेमुळे आम्हाला दुष्काळी परिस्थितीमध्येही उत्तम पीक घेण्यासाठी फायदा झाला, आमची शेती वाचली, आमच्या आयुष्यात आमच्या प्रगतीसाठी या योजनांचा आम्हाला लाभ झाला, अशा विविध प्रतिक्रिया नोंदविल्या. त्याबरोबरच बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडचणी येतात, चारा टंचाई जाणवत आहे, त्यासाठी चाऱ्याची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणणे गरजेचे आहे, ज्यामुळे जरबेरासारख्या फुलांना बाजारात अधिक मागणी निर्माण होऊ शकते, अशा प्रकारच्या काही सूचनावजा विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्या.
राज्य शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी आज राज्यभरातील शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी यावेळी सांगितल्या. शेतीशी निगडित योजना ऑनलाईन केल्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसला, पारदर्शकता आली, असे अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते.
 मुख्यमंत्र्यांना दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. ती ऐकून ज्या भागात शेतीचे समतलीकरण करता येत नाही अशी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने विभागाला दिले.गटशेतीला राज्य शासनाने चालना दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहे.  गटशेतीमुळे शेतकरी एकत्रित आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्याचा फायदा मिळतो आणि एकरी उत्पन्न वाढीतही त्याचे लाभ मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी गटांनी मेगा फूड पार्क योजना राबवावी. त्याला शासनातर्फे अनुदान दिले जाईल. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्यावर त्याला भाव देखील चांगला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले .शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण, कर्जमाफी यासह शेतमालाला बाजारभाव, फुलशेती, सेंद्रिय शेती यासह विविध विषयांवर चर्चा झाली.  
सुमारे तीन तास मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्षात बोलायला संधी मिळाली याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.  
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सुरुवात झालेल्या महाॲग्री टेक कार्यक्रमामुळे शेतीत आधुनिकता येईल. त्या माध्यमातून राज्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरचा संवाद प्रेरक आणि मार्गदर्शक ठरला. शेतीच्या प्रश्नांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.  
                               *****